पार्ले (पश्चिम) मुंबई येथे निराधार अवस्थेत पदपथावर सहा महिन्यांपासून राहत होते बांधव
पायाच्या जखमेतील किडे काढून संदिप परब यांनी केली निराधार बांधवाची सुश्रुषा
खारेपाटण (प्रतिनिधी): जगी ज्यांचे कोणी नाही, त्यांचेसाठी आम्ही आहोत. असे ब्रीद घेवून जीवन आनंद संस्था कार्य करीत आहे. या संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी पार्ले (प) येथे फुटपाथवर राहणारे गणेश देसाई (वय-५६) या निराधार वंचित व्यक्तीस नुकतेच संस्थेच्या सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टरमधे उपचार आणि देखभालीसाठी दाखल केले. गणेश देसाई यांच्या डाव्या पायाला झालेल्या जखमांमधे किडे झालेल्या अवस्थेत ते फूटपाथवर कित्येक दिवस राहत होते.
जीवन आनंद संस्थेचे हितचिंतक असलेले कोकणकट्टाचे संस्थापक अजित पितळे यांनी याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांना कळविली. त्यानंतर संदिप परब यांनी त्यांचे सहकारी संपदा सुर्वे, रूपेश गावडे व रत्ना लांघी यांचेसह गणेश देसाईंची भेट घेतली. संदिप यांनी त्यांच्या जखमेतील किडे काढून जखम साफ केली. आणि प्रथमोपचार करून त्यांना कार्व्हर डे नाईट शेल्टर मध्ये ऊपचार आणि देखभालीसाठी दाखल केले. कार्व्हर डे नाईट शेल्टर हे शेल्टर होम बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दीन दयाळ उपाध्याय शहरी बेघर निवारा योजने अंतर्गत चालविण्यात येत आहे.
गेले सहा महिने कुपर रूग्णालयाजवळ निराधार आणि वंचित अवस्थेत थंडी- उन- वादळ - वा-यात जीवन जगणा-या गणेश देसाई या हाडामासाच्या माणसाला आता आधार मिळाला आहे.












