आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तोंडवळी येथे हॉटेल नित्यानंद या ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची वनविभागाच्या वतीने सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याबाबत हिरेन्द्र घाडी यांनी वनविभागाला कळविल्या नंतर वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक अनिल परब यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने खवले मांजरास सुरक्षित पकडून ताब्यात घेतले. उपवनसंरक्षक श्री रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वनशेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सदर खवले मांजराची तपासणी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दळवी यानी केली. यानंतर या खवले मांजरास सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. खवले मांजर जैवविविधता परिसंस्थेतील प्रमुख घटक आहे. तसेच ते दुर्मिळ होत चाललेला प्राणी असल्यामुळे त्याला 1972 च्या कायद्याने संरक्षित केलेले आहे अशी माहिती मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी दिली.

