स्वच्छता प्रेमींकडून पर्यटकांचे स्वागत आणि विनंती
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आली आली दिवाळी आली स्वच्छतेची वेळ झाली’ असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन स्वच्छता प्रेमींनी सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे फोंडाघाट – दाजीपूर येथील सिंधुदुर्ग सीमेवर स्वागत केले आणि आमच्या स्वच्छ व पर्यटन जिल्ह्यात वाहनातून प्लास्टिक बाटल्या व कचरा बाहेर रस्त्यावर फेकू नका अशी विनंती देखील केली. या उपक्रमाचा फार मोठा प्रभाव पर्यटकांवर पडला आणि त्यांनी आनंद ही व्यक्त केला.
‘ आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले स्वागत आहे .आमचा जिल्हा देशात सर्वात स्वच्छ जिल्हा आहे .आमचा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. इथे पर्यटनाचा आनंद लुटा मात्र गाडीतून प्लास्टिक कचरा बाटल्या चालता चालता बाहेर फेकू नका; असे आवाहन या स्वच्छता प्रेमींनी पर्यटकांना केले स्वच्छता मिशन मार्फत राबवलेल्या या उपक्रमात पत्रकार गणेश जेठे, महेश सावंत महसूल विभागाचे मंडल अधिकारी दिलीप पाटील, पत्रकार तुषार नेवरेकर ,मोहन पडवळ ,सचिन राणे, गुरुप्रसाद सावंत, अनिल मेस्त्री, सत्यवान साटम ,विजय जामदार,सुधीर राणे,विजय तेजम, संजय नेरुरकर ,पोलीस मारुती बारड, मनोज ठाकूर ,अमित गोसावी, कुमार नितीन राणे अभिजीत सावंत इको व्हिलेज डेव्हलपमेंट कमिटीचे प्रसाद पाटील व स्वच्छता प्रेमी सहभागी झाले होते.
कोल्हापूर राधानगरी मार्गे फोंडाघाट या मार्गावरून रविवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करत होते ‘कृपया थांबा ‘असा हातात फलक घेऊन वाहने थांबवली जात होती ही वाहने थांबवण्यासाठी पोलीसही मदत करत होते. येणाऱ्या पर्यटकांचे फुले व गोड पदार्थ देऊन स्वागत केले जात होते .दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक येत होते. आपल्याकडे असलेला कचरा जास्त झाला तर एखाद्या नगरपंचायतीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या बकेटमध्ये टाकावा अशी विनंती पर्यटकांना यावेळी केली जात होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वच्छतेची मोहीम राबविली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्लास्टिक बाटल्या व इतर कचरा फेकू नका अशी विनंती करताच पर्यटक सकारात्मक प्रतिसाद देत होते. अनेक पर्यटकांनी तर टाळ्या वाजवून या उपक्रमाला दाद दिली. स्वच्छता प्रेमींचे भरभरून कौतुक केले. अनेक पर्यटकांनी आपण कचरा टाकणार नाही असा शब्द दिला. अनेक पर्यटक तर आपण सर्वच कचरा या गाडीतच ठेवतो .कुठेही फिरायला गेलो तर बाहेर टाकत नाही असेही सांगितले. काही पर्यटक गाडीतून स्वतः खाली उतरून स्वच्छता प्रेमींसोबत फोटो घेत होते .जवळपास तीन तास ही मोहीम राबविण्यात आली.
समुद्रात खोलवर न जाण्याची विनंती दोन दिवसांपूर्वी मालवण समुद्रात एक जण बुडाला होता पर्यटक समुद्रामध्ये बुडण्याचे प्रकार अनेकदा घडतात म्हणून स्वच्छता प्रेमींनी यावेळी पर्यटकांना खोल समुद्रात न जाण्याची विनंती केली फार फार तर गुडघाभर पाण्यापर्यंत जा पुढे जाऊ नका अशी ही विनंती पर्यटकांना यावेळी करण्यात आली