प्रवाश्यांमधून होतेय मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्यासाठी मध्यवर्ती असलेल्या कणकवली बस स्थानकात रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या नाष्टा, जेवण, नैसर्गिक विधी आदींसाठी काही काळ थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गाकतून होत असल्याचे कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. येथील बस स्थानकातून रात्री ७ नंतर एसटी गाड्यांच्या मुंबई, कोल्हापूर, पुणे, धाराशीव (उस्मानाबाद), विजापूर, पणजी आदी फेऱ्या रवाना होत असतात. पूर्वी या गाड्या उपरोक्त सोयीसाठी १५ ते २० मिनिटे थांबविल्या जात होत्या. राजापूर, गगनबावडा, राधानगरी हे अंतर एसटींना पार करायला दीड- दोन तास लागतात. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते. पुढे नाष्टा, जेवण मिळत नाही. त्यामुळे येथील स्थानकात अशा लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.












