कणकवली ( प्रतिनिधी) : बुक्टू, शिक्षक भारती, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य संघटनाच्या वतीने रविवारी दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कणकवली येथे मराठा मंडळाच्या सभागृहात एकदिवशीय जिल्हास्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नेत्या प्रा डॉ तपती मुखोपाध्याय, मुंबई उपस्थित राहणार असून यावेळी बुक्टू चे अध्यक्ष डॉ. जी. बी. राजे, महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते आर. बी. सिंह, तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी, आशा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हा पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहून विविध शैक्षणिक प्रश्नावर भाष्य करणार आहेत.
या परिषदेत नवीन शैक्षणिक धोरण २०२० चे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम, याचबरोबर विद्यार्थी, पालक, अंगणवाडी कर्मचारी , आशा वर्कर्स, संस्थाचालक यांचे प्रश्न, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, शिक्षणाचे कंत्राटीकरण, अनुकंपा धोरण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी, शाळा बंदचा निर्णय, समूह शाळेचा निर्णय, स्वायत्त महाविद्यालये निर्णय, तासिका तत्त्वावरील शिक्षक / प्राध्यापकांचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदी विविध विषयावर विचारमंथन होणार आहे.
या परिषदेत मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन (बुक्टू); शिक्षक भारती (प्राथमिक व माध्यमिक); अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (सिंधुदुर्ग); अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ (सिंधुदुर्ग); सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अद्यापक संघ; सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक परिषद; सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटना; सत्यशोधक शिक्षक सभा; सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना; सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना; सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ट महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना;
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ; सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक संस्था संघटना,स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI); सत्यशोधक विद्यार्थी संघटना; अ. भा. जनवादी महिला संघटना (AIDWA)महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभा (सिंधुदुर्ग); सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन (सीटू) आदी विविध संघटनांचे सुमारे ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या शैक्षणिक परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वरील सर्व संघटनांच्या वतीने सहनिमंत्रक प्रा.विनोदसिंह पाटील यांनी केले आहे.