आचरा (प्रतिनिधी): पळसंब गावामध्ये गेले काही दिवस दूरसंचार विभागाच्या खंडित होणाऱ्या सेवेमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गावात मनोरा असतानाही ‘ रेंज ‘ कार्यान्वित नसल्याने ग्रामपंचायत स्तरावरून वारंवार दूरसंचार विभागाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र दूरसंचार कडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट सबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा केला असता समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने दूरसंचार विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात आपण एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले आहे, अशी माहिती सरपंच महेश वरक आणि उपसरपंच अविराज परब यांनी दिली. पळसंब गावात दूरसंचार विभागाचा मनोरा असतानाही रेंज येत नाही. परिणामी नागरिकांचे तसेच विद्याथ्यर्थ्यांचे तसेच इतर शेतकरी वर्ग व ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. दूरसंचार विभागाकडे पाठपुरावा करूनही रेंज सेवा सुरळीत सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने पळसंब ग्रामपंचायत कार्यालयनजिक असलेल्या दूरसंचार मनोरा येथे सरपंच वरक व उपसरपंच परब यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच सुहास सावंत, दादा पुजारे, माजी सदस्य अरुण माने, पिंट्या सावंत, बाबू सावंत, अशोक सावंत वैभव सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या उपोषणाबाबत दूरसंचार विभागासह पोलिस यंत्रणेला कळविण्यात आले आहे.