प्रकाश मालंडकर यांचे 3 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित

कणकवली (प्रतिनिधी) : मूळ हिंदळे – मोर्वेवाडीतील व सध्या कणकवलीत वास्तव्यास असणारे प्रकाश मालंडकर यांचे 3 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. कुडाळ पिंगुळी येथील ठाकर समाजाच्या खिवारी या भाषेवर ‘खिवारी : ठाकर समाजाची सांकेतिक भाषा’ हा शोधनिबंध ‘Journal of Emerging Technologies and Innovative Research’ (JETIR) या जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे. तसेच गोव्यातील लोकनाट्यावर ‘लोकनाट्याचा त्रिवेणी संगम : काला’ आणि ‘दहा अवतारांचा खेळ’ हे दोन शोधनिबंध ‘RESEARCH JOURNEY’ (International E-Research Journal) या जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत.

मच्छिमार कुटुंबातील प्रकाश यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा मोर्वे तर माध्यमिक शिक्षण रामेश्वर हायस्कूल मिठबांव मध्ये झालं आहे. पदवी शिक्षण स. ह. केळकर कॉलेज देवगड मध्ये तर ‘मराठी साहित्य’ या विषयातून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण कणकवली कॉलेल, कणकवली येथे झाले आहे. प्रकाश यांनी सहायक प्राध्यापक पात्रताची नेट (NET) ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होवून Ph.D. साठीची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) प्राप्त केली आहे. सध्या ते महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथे ‘गोमंतकातील लोकनाट्याचा सामाजिक व सांस्कृतिक अभ्यास’ या विषयात Ph.D करत आहेत. तसेच विद्यापीठात अध्यापनाचे कार्य देखील करत आहेत.

वरील शोधनिबंधाचे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शक आणि बडोदा विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. संजयकुमार करंदीकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पद्मश्री परशुराम गंगावणे, चेतन गंगावणे, मोहन रणसिंह आणि गोमंतकीय साहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुटुंबीयांची देखील त्यांना खूप साथ लाभली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!