मुख्यालय पत्रकारांचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन सादर
ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची शहरे नगरपंचायत किंवा नगर परिषदा झाल्या.मात्र,जिल्ह्याची राजधानी असलेली सिंधुदुर्गनगरी अद्याप नगरपंचायत झालेली नाही.राज्यातील एकमेव जिल्हा राजधानी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे. याबाबत जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी पुढाकार घेताना दिसत नाहीत.मात्र,येथील नागरिकांना नगरपंचायत हवी आहे. त्यामुळे याबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ २७ डिसेंबर रोजी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करणार आहे. तसे निवेदन आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आले आहे.
या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना शुक्रवारी दिले. यावेळी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते.यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे,सचिव लवू म्हाडेश्वर,उपाध्यक्ष विनोद परब, नंदकुमार आयरे,दत्तप्रसाद वालावलकर,विनोद दळवी,मनोज वारंग आदी उपस्थित होते.
मुख्यालय पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात, सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जिल्हा मुख्यालयाची निर्मिती सिंधुदुर्गनगरी येथे होवून ३० वर्ष उलटली मात्र या ठिकाणी, स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपंचायत होवू न शकल्याने सिंधुदुर्गनगरी शहराचा अपेक्षित विकास होवू शकलेला नाही. सिधुदुर्गनगरीसाठी नवनगर विकास प्राधिकरण आहे. मात्र, प्राधिकरणजवळ विकास निधी नसल्याने विकास कामे करताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा विकास व्हायचा असेल तर नगरपंचायत होणे अत्यंत आवश्यक आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत किंवा नगरपालिका झालेल्या आहेत. मात्र एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा त्याला अपवाद आहे. सिंधुदुर्गनगरी शहरातील लोकवस्ती वाढत आहे. मात्र त्याना नागरी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे सातत्याने नगरपंचायत होण्यासाठी मागणी केली जात आहे. मात्र प्रत्येकवेळी मंत्री, लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून आश्वासनेच मिळाली. प्रत्यक्षात आजपर्यंत नगरपंचायत होवू शकलेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत निर्माण होण्याच्या आग्रही मागणीसाठी सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने २७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पुढील एक महिन्यात सिधुदुर्गनगरी नगरपंचायत निर्मितीबाबत ठोस पावले न उचलल्यास नागरिकांच्या सहभागाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असेही या निवेदनात नमूद केले आहे.