सिंधूदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था., सावंतवाडी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सन २००३ व २००६ साली बँकेच्या सावंतवाडी व सावंतवाडी शहर शाखेमार्फत इमारत खरेदीसाठी रु. २१.०० लाख, सोने तारण कर्ज वितरणासाठी रु. २५.०० लाख व पतसंस्थेच्या सभासदानां कर्ज वितरण करण्यासाठी कँश क्रेडीट कर्ज रक्कम रु. ४.५० कोटी असे एकुण ४.९६ कोटी एवढी कर्ज उचल देण्यात आली होती. सदर कर्ज उचल केल्या नंतर भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेने सदर रक्कम मुदतीत भरणा केली नाही. सदर रक्कम भरणा करण्या संदर्भाने बँकेने तत्कालीन संचालक मंडळाला रक्कम भरणा करण्या संदर्भाने वारंवार तोंडी व लेखी सुचना दिल्या होत्या. तसेच संस्थेच्या कर्ज वसुलीसाठी बँक आपले अधिकारी नियुक्त करुन पतसंस्थेला सहकार्य करत होती. परंतु भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी व पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी पतसंस्थेच्या थकित कर्जदार सभासदांकडुन बँकेने वसुल केलेली रक्कम बँकेच्या कर्ज खाती जमा केली नाही. त्यामुळे बँकेने मे २०१२ मध्ये सहकार कायद्यातील तरतुदीनुसार मे. सहकार न्यायालय, कोल्हापुर येथे तीनही कर्जखात्यांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी लवाद दावा क्र. १६१/१२, १६४/१२ व १६५/१२ असे तीन दावे दाखल केले होते.
सदर लवाद दावे दाखल केल्यानंतरही भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ तसेच संस्थेच्या अधिकाऱ्यांनी थकीत रक्कम भरणा करण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी बँकेने दाखल केलेले दावे खोट्या कागदपत्रांच्या आधारे दाखल केले असुन संस्थेने कर्ज घेतलेच नसल्याचे म्हणणे मे. न्यायालयाला सादर केले होते. तसेच सदर दाव्याचा निकाल वेळेत लागु नये यासाठी मे. सहकार अपिलेट न्यायालय, मुंबई येथे अपिल दाखल करुन वेळकाढुपणा करण्याचे धोरण आखले होते.
सदर दाव्यांवर गेली मागील बरीच वर्षे सुनावणी चालु होती त्यातील १६१/१२, १६५/१२ हे दोन दावे निकालाच्या अंतिम टप्प्यात असुन सोने तारण थकित कर्जवसुलीचा लवाद दावा क्र.१६४/१२ वर मे. सहकार न्यायालय, कोल्हापुर यांनी आज दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बाजुने निर्णय देत दाव्यातील नमुद थकित कर्जाची रक्कम रु. ४९,३५,३६५ व दावा दाखल केलेपासुन ११.५०% व्याज दराने भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था व त्याच्या सर्व संचालकांकडुन वसुल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला न्याय मिळाला आहे. सदर लवाद दाव्या कामी बँकेचे वकील अडव्होकेट अमोल आनंदा पाटील, कोल्हापुर यांनी काम पाहीले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निकाल आहे असे आम्ही मानत असुन बँकेच्या कोणत्याही प्रकारच्या थकबाकीच्या वसुलीबाबत तडजोड केली जाणार नाही हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. या निकालामुळे बँकेची एन.पी.ए. रक्कम वसूल होण्यासाठी मदत होणार असून यासारखे अन्य न्यायालयीन प्रकरणेही लवकरात निकाली निघतील. असा विश्वास बँकेचे अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.