कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील संदीप चौकेकर मित्रमंडळाचा खंदा कार्यकर्ता , शिरवल गावचे रहिवासी अजित महादेव पेंडूरकर ( वय 35 ) यांचे 19 डिसेंबर रोजी शिरवल येथील राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. ते अविवाहित होते. अजित पेंडूरकर हे संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असत. अजित यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते नेहमी चोख बजावत असत. संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने साजरा होत असलेला नवरात्रोत्सव असो अथवा अन्य कोणताही धार्मिक किंवा सामाजिक उपक्रम असो, अजित पेंडूरकर नेहमीच प्रत्येक उपक्रमांत हिरीरीने सहभागी होत असे. केवळ सहभागी न होता प्रत्येक उपक्रमाच्या आयोजन आणि नियोजनात जातिनिशी लक्ष घालून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात हातभार लावत असे.अजित यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चत भाऊ, चुलते, आत्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शिरवल येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.