कणकवली (प्रतिनिधी) : कुंरगवणे येथील भास्कर जीवाजी लाड यांना चिव्याच्या बांबूने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच निवृत्ती श्रीधर पवार याची येथील सह प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
२३ फेब्रुवारी २०१९ रोजी कुरंगवणे येथील भास्कर लाड हे राजेंद्र पवार यांच्या किराणा दुकानावर देव चव्हाटा येथे बाजारहाटासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी निवृत्ती पवार याने येऊन ‘तू गावची वाट लावलीस, राजकारण करून गावात गट केलेस’ असे म्हणून तेथील चिव्याच्या बांबूने फिर्यादीला जबर मारहाण केली. त्यामुळे गंभीर दुखापती झाल्याने फिर्यादी औषधोपचार घेत असताना उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. जे. बी. मंडावरे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भांदवि कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवला.
सुनावणीत सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, वैद्यकीय पुरावा व वास्तव यातील विसंगती यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.