कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नुकतीच वित्तीय साक्षरता कार्यशाळा पार पडली.शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन केशवराव राणे यांच्या जयंतीनिमित्त ‘सेबी’ मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा आर्थिक घडामोडीचे अभ्यासक डॉ. विजय काकडे यांची उपस्थिती होती.
काकडे यांनी यावेळी गुंतवणूक आणि भविष्यात होणारी भाववाढ, गुंतवणूकीचे मार्ग आणि नियोजन,आर्थिक गुंतवणुकीतील जोखीम, शेअर मार्केटच्या संधी, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार तसेच गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना, डॉ. राजश्री साळुंखे यांनी केशवरावजी राणेसाहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. केशवरावजी राणे यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. तसेच मानवी आयुष्यात गुंतवणूक व बचत किती महत्त्वाची आहे याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले.
यावेळी अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण गावडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ.सोमनाथ कदम, पर्यवेक्षक के. जी. जाधवर ,सर्व प्राध्यापक वृंद, व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन दर्पे यांनी केले.