सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सद्ध्याच्या राष्ट्रीयकृत बँकाच्या असलेल्या तीव्र स्पर्धेच्या काळात जिल्हा बँकांसमोर विविध आव्हाने असुन त्याला सामोरे जाण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरुन त्यावर मात केली पाहिजे असे मत ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे आयोजित ‘जिल्हा बँकांसमोर आव्हान’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात व्यक्त केले.या मार्गदर्शन कार्यक्रमाची सुरवात ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल,उपाध्यक्ष अतुल काळसेकर व संचालक मंडळ यांनी दिपप्रज्वलनाने केली.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर,सर्वश्री.गजानन गावडे,विठ्ठल देसाई,आत्माराम ओटवणेकर,प्रज्ञा ढवण,नीता राणे,रवींद्र मडगांवकर,समीर सावंत,दिलीप रावराणे,विद्याप्रसाद बांदेकर,मेघनाद धुरी आदि मान्यवर संचालक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री गांगल म्हणाले.आपण छोटे आहोत हा विचार न करता ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा कशी देता येईल याचा विचार प्रकर्षांने करणे गरजेचे असुन कार्पोरेट व राष्ट्रीयकृत बँकांशी स्पर्धा करीत असताना जिल्हा बँकांची ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे व आपुलकीचे नाते ही जिल्हा बँकांची जमेची बाजु असुन त्याचा वापर व्यवसाय वाढीसाठी करायला हवा असे मत त्यानी व्यक्त केले.
प्रशिक्षीत अधिकारी, कर्मचारी हा संस्थेचा खऱ्या अर्थाने पाया असतो आणि प्रत्येक जण सर्व काही शिकून जन्माला येत नसतो आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अनुभवातून अनेक गोष्टी आपणाला शिकायच्या असतात. बँकेच्या माध्यमातुन ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन दर्जेदार सेवा देण्याची विद्यमान संचालक मंडळाची भूमिका राहिलेली आहे.जिल्हा बँकेच्या बरोबर जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब जोडले गेले आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण करीत असलेल्या बँकींग मधुन आपल्या ग्राहकाला बँकेचा अभिमान वाटवा असे काम झालं पाहीजे. त्यासाठी दिवसागणिक आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जे काही बदल होत आहेत ते बदल स्वीकारण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शक श्री.गांगल यांचे स्वागत करताना बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले की सिधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत आकाराने लहान असला तरी गेल्या २ वर्षात आपण जी प्रगती केली ती निश्चित कौतुकास्पद आहे. यामध्ये संचालक मंडळाबरोबर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाटा आहे. बदलत्या काळनुरुप अद्यायावत तंत्रज्ञान स्वीकारण्याची मानसिकता आमच्या कर्मचाऱ्यामध्ये असल्याने हे यश प्राप्त करु शकलो असे मत त्यानी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन शरद सावंत यांनी केले.