केंव्हाही हाक मारा मी सदैव आपल्या सोबत, जेवढी जबाबदारी संस्थेची तेवढीच जबाबदारी मी माझी समजतो – आमदार नितेश राणे
शिवराज्याभिषेक सोहळ्याने जिंकली उपस्थितांची मने
वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि.२३-१२-२०२३ रोजी प्रशालेच्या भव्य पटांगणावर संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रशालेच्या ‘झेप’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सदानंद रावराणे यावेळी उपस्थित होते.
स्नेहसंमेलन निमित्त पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत सलोनी पवार यांनी प्रथम क्रमांक, अनघा पाटील यांनी द्वितीय क्रमांक तर रुपाली हावळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शिवाय संगीत खुर्ची स्पर्धेत विनया फाळके यांनी विजेते पद पटकावले व रस्सीखेच स्पर्धत रामदास पवार यांच्या पालक संघाने बाजी मारली. या सर्व विजेत्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिवाय एस.एस.सी मार्च २०२३ व एच.एस.सी. फेब्रुवारी २०२३ परिक्षेत अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना व तलवारबाजी, कुस्ती, चालणे या क्रिडा प्रकारात विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व रंगोत्सव आर्ट यांच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना देखील गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले.
वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने यंदा देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक विभागातुन आकांक्षा गंगाधर केळकर , माध्यमिक विभागातुन प्राची प्रमोद सावंत व उच्च माध्यमिक विभागातुन नंदकिशोर विनायक प्रभू यांची निवड करण्यात आली तसेच उत्कृष्ट कर्मचारी म्हणून तुकाराम लक्ष्मण बावदाणे यांची निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांना देखील सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन आमदार राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या पाच वर्ग खोल्यांचे उद्घाटन यावेळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
दीपप्रज्वलन व स्वागत गीताने पारितोषीक वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभू एन.व्ही, सबनीस एस.ए. मरळकर व्हि.एस., यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले स्नेहसंमेलन प्रमुख सावंत पी.पी. यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार सावंत पी.जे .यांनी व्यक्त केले. पाककला स्पर्धेत परिक्षक म्हणून विजया रावराणे, अमृता चव्हाण यांनी काम पाहिले. स्नेहसंमेलन निमित्त विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, बहारदार नृत्य आविष्कार सादर केले. शिक्षक कर्मचारी वर्गाने साकारलेल्या शिव राज्याभिषेक सोहळ्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली. संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका उत्कृष्ट रीतीने पार पडली तर शिक्षक व शिक्षिका यांनी अष्टप्रधान मंडळातील सर्व सदस्य व जिजाबाई, शिवरायांच्या पत्नी, संभाजी राजे यांच्या व्यतिरेखा साकारल्या होत्या. या राज्याभिषेक प्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडीने फेर धरून एक भक्तिमय रोमहर्षक वातावरणात निर्माण केले. शिवाजी महाराज की जय … जय भवानी जय शिवाजी… या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले आपण विद्यार्थी हितासाठी मोफत सेमी इंग्लिश स्कूल चालवता ही गौरवास्पद बाब आहे परंतु भावनिक होऊन कोणतीही संस्था मोठी होत नाही त्यामुळे संस्थेला आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न करावे. शिक्षणातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होऊ शकतो हे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी ओळखून पहिल्या पासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण व आरोग्य विषयक सोई सुविधा यांना नेहमीच प्रथम प्राधान्य दिले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार होताना अतिशय आनंद होत आहे. प्रशालेतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था करत आहे असे मत यावेळी राणे यांनी व्यक्त केले. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेने किंबहुना रावराणे कुटुंबांनी केव्हा ही हाक मारावी मी तुमच्या सोबत आहे. जेवढी जबाबदारी संस्थेची तेवढीच जबाबदारी मी माझी आहे असं समजतो, आपण जी जबाबदारी आमच्यावर टाकाल ती आम्ही नक्कीच पुर्ण करु अशी ग्वाही आपल्या मनोगतातून आमदार नितेश राणे यांनी संस्थेला दिली. यावेळी शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने शैक्षणिक कार्य उत्तम सुरू असल्याचे मत संस्था अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांनी व्यक्त केले. तर भविष्यात वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश परिक्षा घेऊन या शाळेत प्रवेश मिळवावा लागेल अशी नामांकित व दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून शाळेची ओळख निर्माण करणारअसल्याचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी सांगितले. व संस्थेचे सचिव अर्जुन रावराणे यांनी देखील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. युवा उद्योजक सुनील नारकर यांनी देखील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे, आमदार नितेश राणे, संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, सचिव अर्जुन रावराणे,शरद नारकर, नगराध्यक्षा नेहा माईणकर , रोहन रावराणे, युवा उद्योजक सुनील नारकर, गंगाधर केळकर, विजय तावडे, हुसेन लांजेकर,संस्थेचे सर्व संचालक मंडळ, वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















