” गोसावी समाजाचे पारंपारिक विधी आणि संस्कृती यांच जतन झाल पाहिजे.” – गणेश गोसावी

नाथपंथी गोसावी समाज सिंधुदुर्गचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

चौके ( अमोल गोसावी ) : ” मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत गोसावी समाज काय आणि किती पटीने आहे ते आज आम्हाला दिसले. नाथपंथी गोसावी समाजाच्या समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी आपल्याला एकत्र व्हावच लागेल ही काळाची गरज ओळखून आपण एकत्र आलो आणि सात संस्था मिळून कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाची स्थापना केली. गोसावी समाजाचे पारंपरिक विधी आणि संस्कृती यांच जतन होऊन ते पुढील पिढीकडे पोचवून त्यांचा विकास केला पाहिजे. आमचे मार्गदर्शक कै. मनोहर गोसावी ( वागदेकर ) यांचे समस्त गोसावी समाज एकसंघ करण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे करत असताना कुठल्याही संस्थेच्या पारंपारिक विधीमध्ये ढवळाढवळ न करता आपल्याला हा महासंघ एकत्र आणायचा आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाच समाजमंदिर झालं पाहिजे त्यासाठी प्रत्येक समाजघटकाने आपापल्या मंडळाला सढळ हस्ते देणगी दिली पाहिजे आणि आपण निवडून दिलेल्या आमदार , खासदार यांची हक्काने मदत घेतली पाहिजे.”

असे प्रतिपादन कोकण विभाग नाथपंथी गोसावी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. गणेश गोसावी यांनी कुडाळ येथे नाथपंथी गोसावी समाज सिंधुदुर्गच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात बोलताना केले. नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित गोसावी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव , निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि वार्षिक स्नेहमेळावा रविवार २४ डिसेंबर रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी संगिता सदाशिव गोसावी यांच्या सह कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाचे अध्यक्ष गणेश गोसावी, कार्याध्यक्ष तथा नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष विनोद गोसावी , सचिव अमरदीप गोसावी , अरविंद गोसावी , कोकण महासंघाचे कार्यकारीणी सदस्य कामिनी गोसावी , संगिता खांबल , यशवंत काणेकर , शंकर कांबळ , राजेंद्र खांबल , कामिनी गोसावी, अनिता बामणे , अमृता राणे, पांडुरंग लाखे , दशरथ जांभळे, पांडुरंग गोसावी , जयेंद्र जांभळे, वामन हळदे, सिंधुदुर्ग मंडळाचे सल्लागार संजय गोसावी , शरद गोसावी , उपाध्यक्ष साईनाथ गोसावी , सचिव सदानंद गोसावी , संदिप गोसावी , प्रा. भाऊसाहेब गोसावी , महिला कार्यकारीणी अध्यक्षा स्नेहा गोसावी , उपाध्यक्ष सुलभा गोसावी , सचिव विनया गोसावी , खजिनदार श्वेता गोसावी, आणि इतर सर्व कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर प्रमुख मान्यवर आणि कोकण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा नाथपंथी गोसावी समाज सिंधुदुर्ग यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर गोसावी समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी , तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री दिपक गोसावी यांचा समाजाच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देउन यथोचित सत्कार करण्यात आला. आणि मान्यवरांच्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारीतोषिक आणि सन्मानचिन्ह देउन गुणगौरव करण्यात आला. ही सर्व पारितोषि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद गोसावी यांनी पुरस्कृत केली होती.

त्याचप्रमाणे यावेळी कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाच्या वतीने सेवानिवृत्त तहसीलदार शरद गोसावी, मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा, उर्मिला गोसावी, शिक्षक कवी व साहित्यिक कमलेश गोसावी, १० वीत गोसावी समाजात राज्यात प्रथम आलेला पार्थ संतोष गोसावी यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याबरोबरच प्रतिवर्षी प्रमाणे मुंबई मंडळाचे सचिव अमरदीप गोसावी यांनी सपत्नीक उपस्थित राहून महिलांसाठी हळदीकुंकू लागणारे सर्व साहित्य पुरस्कृत केले. दुपारनंतर उपस्थित ५० वर्षावरील नाथ बांधवांची मोफत नेत्रतपासणी करून सुमारे ७० जणांना कै. शांताराम गोसावी यांच्या स्मरणार्थ मोफत चष्मे वाटप करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांनी दिली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष तथा कोकण महासंघाचे कार्याध्यक्ष विनोद गोसावी यांनी सांगितले कि, ” आता आपण एकटे नसून कोकण महासंघाच्या माध्यमातून कोकणातील सात मंडळे एकत्र आल्याने आपली ताकद वाढली आहे. गोसावी समाजाच्या समस्या एकत्रितपणे शासन स्तरावर मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न महासंघ करणार आहे. कोकण महासंघाच्या स्थापनेच श्रेय्य अध्यक्ष गणेश गोसावी यांच आहे. येणाऱ्या काळात संघटना म्हणून महासंघ आपल्याला हाक मारेल तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी उभ राहिलं पाहिजे. ” असे बोलून मेळाव्यातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समाधान व्यक्त करून नवनिर्वाचित महिला कार्यकारीणीच्या कार्याचे कौतुक केले.

तसेच कोकण महासंघाच्या सदस्या संगिता खांबल यांनी महिलांना प्रोत्साहन देउन अशा कार्यक्रमातून आपल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते त्यावेळी त्यांच्या यशाचे कौतुक होत असताना पालकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले. अंततः कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांनी नाथबांधव भगिनींनी आपल्या मुलांना व्यसन आणि मोबाईलच्या अती वापरापासून दूर ठेवावे असे सांगून विद्यार्थ्यांनी तांत्रीक शिक्षण घेऊन व्यवसाय करण्यावर भर द्यावा. नोकरीच्या मागे लागून आयुष्यातील वेळ वाया जाऊ न देण्याचे आवाहन केले आणि येत्या दोन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोसावी समाजाच्या वतीने गुरुकुल उभारणी करून दाखवणार असा विश्वासही व्यक्त केला. हा स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच महिला कार्यकारीणीच्या सर्व महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन झिलु गोसावी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!