नगरपंचायत प्रशासन खेळतेय कणकवलीकरांच्या जीवाशी
राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नळयोजनेचा फिल्टर प्लांट गेले वर्षभर बंद राहिला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान नळयोजनेच्या प्लांट दुरूस्तीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला मंजूर मिळाल्यांनतर लगेच दुरूस्तीची कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे. मात्र दरम्यानच्या काळात गेले वर्षभर कणकवलीकरांना नळ योजनेचे पाणी फिल्टर केल्याशिवायत दिले जात आहे.
कणकवली शहरातील नागरिकांसाठी गडनदीपात्रालगत मुडेश्वर मैदान समोर नगरंपचायतीने फिल्टरेशन प्लांटची उभारणी केली आहे. नदीपात्रातून आणलेले पाणी या प्लांटमध्ये प्रक्रिया करून शुद्ध केले जाते. त्यानंतर ते पाणी नळयोजनेच्या माध्यमातून पुरविले जाते. मात्र गेले वर्षभर हा फिल्टर प्लांट बंद पडला आहे. या प्लांटमधील अनेक यंत्रसामग्री निकामी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने आउटलेट चे वॉल व पाईपलाईन खराब झाली की माहिती समजली आहे. त्यामुळे शहरातील नळ ग्राहकांना नदीपात्रातील पाणी कोणतीही प्रक्रिया न करताच दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कणकवली शहरात गेल्या वर्षभरात कोट्यवधीची विकासकामे झाली. मात्र शहरवासीयांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या फिल्टरेशन प्लांट दुरूस्तीकडे सत्ताधारी आणी नगरपंचायत प्रशासनाने गांभिर्याने पाहिलेले नाही. विरोधकांची देखील या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष राहिले आहे. त्यामुळे फिल्टरेशन प्लांट बंद राहूनही त्याच्या दुरूस्तीबाबत कार्यवाही झाली नाही. याबाबत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण नगरपंचायतीचा चार्ज घेतल्यानंतर लगेचच फिल्टरेशन प्लांटची पाहणी करून दुरूस्तीबाबत कार्यवाही सुरू केल्याची माहिती दिली.
कणकवली शहरातील अनेक नागरिक खासगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र ज्या नागरिकांकडे विहिरी नाहीत त्या ग्राहकांना कणकवली नगरपंचायतीच्या नळयोजनेचाच प्रमुख आधार राहिला आहे. अनेक नळयोजने ग्राहक पिण्यासाठी देखील नळयोजनेचे पाणी वापरतात. त्यामुळे नगरपंचायतीचा फिल्टरेशन प्लांट तातडीने दुरूस्त करण्याचीही मागणी नागरिकांतून होत आहे.