कणकवली तालुका पत्रकार समितीची आ. नितेश राणे यांच्याकडे मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह कणकवली तालुक्याच्या आरोग्य विभागात रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध पदे भरण्यात यावीत, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांच्याकडे गुरुवारी कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी आपण चर्चा केली असून ३१जानेवारीपर्यंत रिक्तपदे भरण्यात येतील. याशिवाय आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. राणे सांगितले.
आरोग्य विभागात रिक्त असलेली विविध पदे व आरोग्य विषयक प्रश्न आदीबाबाबत ओम गणेश निवासस्थानी आ. नीतेश राणे यांची कणकवली तालुका पत्रकार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीचे सदस्य संतोष राऊळ, तालुका पत्रकार समितीचे सचिव माणिक सावंत, माजी तालुकाध्यक्ष भगवान लोके, सुधीर राणे, तुषार सावंत, महेश सावंत, विशाल रेवडेकर, कणकवली तालुका पत्रकार समितीचे कार्यकारिणी सदस्य भास्कर रासम, तुषार हजारे, उमेश बुचडे, मयूर ठाकूर, दर्शन सावंत यावेळी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांसह तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत,तसेच तालुक्यातील आरोग्य विभागातही काही पदे रिक्त आहेत. परिणामी आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होत आहे, त्यामुळे ही पदे त्वरित भरणे आवश्यक असल्याची बाब आ.नीतेश राणे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत व संबंधित अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली असून लवकरच ही पदे भरण्याची ग्वाही आ.राणे यांनी दिली. तसेच पत्रकारांसाठी शहरात राहण्यासाठी सोय व्हावी, याकरिता इमारत उभारण्यासंदर्भात सरकारी आरक्षित जागेचा शोध घेऊन त्याबाबत प्रस्ताव पत्रकार समितीने आपणास द्यावा,सत्ताधारी आमदार म्हणून हा प्रश्न आपण मार्गी लावेन. कणकवलीतही पत्रकार भवन होण्यासाठी प्रयत्न करा, याकरिता आपणास जे जे सहकार्य लागेल ते केले जाईल, असे आश्वासन आ.राणे यांनी दिले.