लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह- सोहळा उत्साहात !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : संस्था-शिक्षकवर्ग -पाल्य आणि पालक ह्या ,गाडीच्या चार चाकांना शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातील एकही डळमळीत असले, तरी त्याचा परिणाम एकूणच शिक्षण- प्रणालीवर होतो. यातील महत्त्वाचे घटक शिक्षक आणि पालक होत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बौद्धिक पात्रतेनुसार आपल्या अपेक्षा बनवाव्यात. आणि ज्या वातावरणात आपण वाढतो, त्या मुक्त शिक्षण मूल्यांसाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. समाजामधील आजूबाजूस असणाऱ्या सुविधा, खेळ- छंद याकडे मुलांचा कल असेल, तर त्यामध्येही त्यांचे करिअर होऊ शकते. त्या दृष्टीने लिटिल फ्लावर विभागामध्ये समन्वय दिसतो, हे कौतुकास्पद आहे. असे उद्गार फोंडाघाट मधील प्रतिथयश डॉ.शैलेंद्र आपटे यांनी काढले.
लिटिल फ्लावरच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांचे हस्ते शारदापूजन व दीप प्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत, संचालक रंजन नेरूरकर,महेश सावंत, संदेश पटेल, लिटिल फ्लावर चे अध्यक्ष सचिन तायशेटे, हायस्कूल मुख्याध्यापक विजय रासम, संतोष टक्के,सुंदर पारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संचालक महेश सावंत यांनी लिटील फ्लॉवर इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचे, पालकांचे आणि शिक्षक वर्गाचे कौतुक केले. आणि शुभेच्छा दिल्या.वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींना स्मृतिचिन्ह- प्रमाणपत्र, मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले. प्र.प्राचार्य विनया लिंग्रस यांनी संपूर्ण वर्षाच्या, प्रगतीचा लेखाजोखा सादर केला. सोहळ्याचे प्रस्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत स्वरा तळेकर यांनी केले. तर मनोरंजन विभागाच्या प्रमुख निलाक्षी चव्हाण यांनी परिश्रमपूर्वक, कल्पकतेने मुलांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे नियोजन केले.याचे सूत्रसंचालन गौरी गावकर आणि करुणा चिंदरकर यांनी ओघवत्या शैलीत केले.त्यांना सहशिक्षक रिया भिसे,श्वेता शिंदे, मदतनीस उर्मिला कूशे यांनी सहकार्य केले. दुसऱ्या सत्रात दरवर्षीची परंपरा कायम ठेवताना, नव्या रंगात- नव्या जोशात मुलांनी विविध गुणदर्शनाचे प्रात्यक्षिक घडविले. यामध्ये विभागातील मुला- मुलींनी कलागुण दाखविताना उपस्थित तमाम रसिकांचे मनोरंजन करून, वाहवा मिळवली. चौफेर कौतुकामुळे पालक वर्गात सुद्धा समाधानाचे वातावरण होते.