सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सन २०२३ या सरत्या वर्षाला निरोप व २०२४ नुतन वर्षाचे स्वागत या निमित्ताने संपूर्ण जिल्हयात विविध ठिकाणी सांस्कृतिक व मनोरंजानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. परंतु कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “JN १० ही नवीन विषाणु प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा धोका विचारात घेवून आयोजकांनी व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने व इतर सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुन नववर्ष स्वागत करणे अपेक्षित आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व समुद्र किनारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बाहेरुन येणारे पर्यटक खाजगी वाहनांनी येत असल्याने रस्त्यांवर नेहमीपेक्षा वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते व वाहतूकीच्या नियमांचे पालन न झाल्यामुळे अपघात होतात, पर्यटकांनी त्यांचे कुटुंब, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती पांची विशेष दक्षता घेवून सुरक्षितेच्या सर्व नियमांचे पालन करावे, वाहतूकीच्या नियमांचे पालन होण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस यांचेकडून बारकाईने लक्ष पुरवून कायदयाचे उल्लंघन करण्याच्या तसेच विशेषतः मद्यपी चालकांविरुदध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आलेले आहेत.
शाळा कॉलेज, अॅकॅडमी यांच्याकडून सहलीचे नियोजन करणाऱ्या आयोजकांनी पर्यटनस्थळी विशेषतः समुद्र किनारी अत्यंत काळजीपूर्वक व सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. जिल्हयामध्ये पर्यटन स्थळी, सागरी किनारी, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केलेल्या ठिकाणी सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हा विशेष शाखा, सागरी सुरक्षा विभाग यांची विविध पथके गणवेषात तसेच खाजगी गणवेषात तैनात करण्यात आलेली असून हॉटेल, लॉज, होमस्टे इत्यांदीची तपासणी करुन अवैध धंदे व बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महिला पोलीस अधिकारी व अंमलदार पांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये महत्वाच्या ठिकाणी तसेच पोलीस चेकपोस्टवर नाकाबंदीचे आयोजन फरण्यात आलेले आहे. नाकाबंदी दरम्यान चेकपोस्टवर पोलीस अधिकारी व अंमलदार यांची कुमक वाढविण्यात आलेली असून कोणत्याही प्रकारची अवैध वाहतूक दिसून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून नववर्षाचे स्वागत आनंदाने साजरे करावे या करोता आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आलेली असून, संपूर्ण बंदोबस्ताकरीता ३ पोलीस उप अधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, ३० सहाय्यक पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक व २०० पोलीस अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बंदोबस्त दरम्यान पोलीसांकडून व्हीडीओग्राफी देखील करण्यात येणार आहे.