आज पासून डाळपस्वारी ला प्रारंभ
यावर्षी यत्रोत्सवानिमित्ताने तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन चा आकर्षक देखावा
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील साकेडी गावचे ग्रामदैवत श्री. लिंगेश्वर पावणादेवी चा वार्षिक जत्रोत्सव 5 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने डाळप स्वारीला 2 जानेवारीपासून प्रारंभ होणार असून, 2 जानेवारी ते 4 जानेवारी पर्यंत डाळपसाठी देवतरंगकाठीं सहीत गावच्या चतु: सीमा फिरणार आहेत. यामध्ये 2 रोजी करूळ सीमेवरील ब्राह्मण, वरचीवाडी ब्रह्मस्थळ व तिथून महालक्ष्मी मंदिरात डाळप स्वारी वस्तीसाठी असणार आहे. 3 तारीखला महालक्ष्मी मंदिरामध्ये दुपारी 1 वाजल्यापासून महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर 3 वाजता देव तरंगकाठीसह वाघोपेवाडी येथील ब्राह्मण स्थळाची भेट घेण्यासाठी शेकडो ग्रामस्थांच्या लवाजम्यांसह जाणार आहेत. तिथून मागे आल्यावर फौजदारवाडी मांड या ठिकाणी देव तरंगकाठीसह वस्तीला असणार आहेत. 4 रोजी दुपारी या ठिकाणी महाप्रसाद होणार असून, त्यानंतर सायंकाळी देव पावनादेवी मंदिरामध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर 5 रोजी सायंकाळी देवतरंग पुन्हा फेरीसाठी निघणार असून, त्यानंतर पावणादेवीची ओटी भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे कार्यक्रम सुरू होणार आहे. रात्री 11 वाजता मंदिराभोवती पंचारती सहीत प्रदक्षिणा व दिंडी काढली जाणार आहे. त्यानंतर रात्री देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंडवणकर दशावतारी नाट्य कंपनीचे नाटक होणार आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी खास तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन हा चलचित्र देखावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच देवीच्या मागील बाजूस यावर्षी नव्याने आकर्षक सजावट देखील करण्यात येणार आहे. मंदिर परिसर या निमित्ताने दरवर्षी विद्युत रोषणाईने उजळून निघतो. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन साकेडी देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.