कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील पांग्रड काजिमाचे टेंब येथील रहिवासी व प्राथमिक शिक्षक गणेश राजाराम मर्गज (३३) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री १० ते बुधवारी सकाळी ८ च्या मुदतीत घडली. याबाबतची खबर त्यांचे वडील राजाराम कृष्णा मर्गज यांनी कुडाळ पोलिसांत दिली आहे. गणेश हे सतत आजारी असायचे. मंगळवारी रात्री ते आपल्या काकांच्या खोलीत झोपायला गेले. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ते उठले नाहीत. त्यांच्या आईने या खोलीकडे जाऊन आवाज देत त्यांना उठविण्याचा प्रयत्न करूनही ते उठले नाहीत. त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ प्रतिक यांनी आत उतरून पाहिले असता, ते लाकडी बाराला गळफास लावलेल्या स्थितीत दिसले. घटना समजताच ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कहराडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार ममता जाधव यांनी पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गणेश सध्या आंब्रड-मोगरणेवाडी प्राथमिक शाळेत कार्यरत होते. असे पोलिसांत दिलेल्या खबरीत म्हटले आहे, गणेश यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, भावोजी, काका, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे.
पांग्रड येथील प्राथमिक शिक्षक गणेश मर्गज यांची आत्महत्या











