कठोर परिश्रम घेत गणेशने मिळवले यश ;बॅंक ऑफ इंडिया निवृत्त सहाय्यक महाप्रबंधक सच्चिदानंद राणे यांचे गणेशला लाभले मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बँकांमध्ये स्थानिक उमेदवारांना नोकरी लागणे हे दुरापास्त होत चालले आहे. सध्या उत्तरेकडील राज्यातील उमेदवार मोठ्या प्रमाणात बँकामध्ये नोकरीवर रुजू होत आहेत.मात्र,कणकवली येथील गणेश अशोक साईम या युवकाने कठोर परिश्रम घेत आयसीआयसीआय बँकेच्या ऑनलाईन परीक्षा व मुलाखत यशस्वीरित्या देत प्रोबेशनरी ऑफिसर पदी नियुक्ती झाली आहे.बॅंक ऑफ इंडिया निवृत्त सहाय्यक महाप्रबंधक सच्चिदानंद राणे यांचे गणेशला मार्गदर्शन लाभले.
कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करायचं असेल तर कठोर परिश्रम व प्रबळ इच्छा शक्ती आवश्यक असते. त्यानुसार परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना देखील असंख्य संकटांना तोंड देत कणकवली येथील गणेश साईम याने आयसीआयसीआय बँकेची ऑनलाईन परीक्षा व मुलाखत यशस्वीरित्या देत प्रोबेशनरी ऑफिसर पदापर्यंत यश मिळवले आहे.कणकवली कॉलेजमधून गणेश साईम याने BAF ची पदवी प्राप्त केली होती.
गेले चार महीने गणेश साईम याने आयसीआयसीआय बॅंक मुख्य कार्यालयात प्रशिक्षण घेत २१ डिसेंबर २०२३ पासुन बॅंकेच्या पवई शाखा ,मुंबई येथे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजु झाला.घरात कोणीही शिक्षीत नाही, वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्यानंतरही जिद्द व कठोर परिश्रम घेवून हे प्राप्त केलेले यश तरुण तरुणींना प्रेरणादायी आहे. गणेश साईम यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.












