शिवसेना नेते भैया सामंत यांच्या अक्षरभेट कार्यक्रमास रामेश्वर वाचनमंदिर येथून शुभारंभ
आचरा (प्रतिनिधी) : वाचन संस्कृती वृद्धींगत व्हावी आणि वाचन संस्कृती वाढविण्याचे कार्य करणाऱ्या वाचनालयांना अक्षरभेट द्यावी या उद्देशाने शिवसेना नेते भैया सामंत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने अलीकडे प्रकाशित केलेली ‘बीज अंकुरे अंकुरे’ (ललित) आणि ‘ये ग ये ग सरी’ (कविता संग्रह) ही दोन्ही पुस्तके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ १३० ग्रंथालयांना विनामूल्य देण्याचा संकल्प केला होता त्याचा शुभारंभ आचरा येथील रामेश्वर वाचन मंदिरच्या १३० व्या वर्धापनदिनी शिंदेशिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख महेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कोमसाप मालवण शाखा अध्यक्ष सुरेश ठाकूर, रामेश्वर वाचनमंदिर अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सदस्य जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, आचरा पतसंस्था चेअरमन मंदार सांबारी, गोलतकर, वैशाली सांबारी, ग्रंथापाल विनिता कांबळी, श्रद्धा सांबारी, वर्षा सांबारी, दीपाली कावले, श्रद्धा महाजनी व अन्य मान्यवर उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमाबद्धल कोमसाप मालवण कार्यकारिणी तसेच आचरा वाचनालय पदाधिकारी बीज अंकुरे अंकुरेचे सर्व लेखक आणि ये ग ये ग सरी चे सर्व कवी यांनी किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत यांचे आभार व्यक्त केले.