जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग पंचायत समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणाचे आयोजन
विद्यार्थ्यांना नवनवी आव्हाने देऊन भविष्यवेधी शिक्षणाकडे घेऊन जाण्याचा प्रशिक्षणार्थ्यांनी केला निर्धार
वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग पंचायत समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा मंगळवार दि.१६ जानेवारी ते शनिवार दि.२० जानेवारी २०२४ रोजी केंद्र शाळा वैभववाडी येथे यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण आपण विद्यार्थ्यांना कोणत्या माध्यमातून देवू शकतो. विद्यार्थ्यांच्या अध्ययन गतीच्या पातळ्यांमध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक भूक समजावून घेऊन त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन त्यास करणे. मुलांना विविध आव्हाने देऊन शिकण्यास प्रेरीत करुन त्यांची शिकण्याची गती वाढवून त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे. याशिवाय अध्ययन प्रक्रियेत विषयमित्र , सेल्फी विथ सक्सेस या संकल्पना कशा पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती व भविष्यवेधी अध्ययन पद्धती यातील फरक अशा विविध संकल्पना बाबत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय अनेक मनोरंजक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये थोडा विरंगुळा जोपासण्याचा प्रयत्न कसा करावा याबाबत देखील काही प्रात्यक्षिक खेळ यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना अनुभवता आले. प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारची आव्हाने प्रशिक्षणार्थींना देण्यात आली ती आव्हाने प्रशिक्षणार्थ्यांनी स्वीकारुन त्यास सकारात्मक प्रतिसाद देखील दर्शविला.
या प्रशिक्षणास तज्ञ मार्गदर्शक सागर पेंडूरकर , वैभव पाटील , राजाराम कात्रे यांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रक्रितील प्रत्येक घटकावर प्रशिक्षणार्थींमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला कमीत कमी वेळात अनेक बाबी प्रशिक्षणार्थींना सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रशिक्षणास वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांचा उत्साह वाढवला.
मंगळवार पासून सुरू असलेल्या या प्रशिक्षणास हळूहळू रंगत चढत गेली. अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी या भविष्यवेधी शिक्षण पद्धतीवर उत्सुर्त प्रतिसाद देत चर्चा घडवून आणली व आव्हान पुस्तिका पुर्ण करण्याचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. उंबर्डे हायस्कूल चे मुख्याध्यापक राठोड सर यांनी अनेक मुद्यांबाबत प्रशिक्षणार्थ्यांशी उत्स्फूर्तपणे संवाद साधला. तर महिला प्रशिक्षणार्थी शिक्षीका देखील प्रत्येक घटकावर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होत्या. विशेष बाब म्हणजे प्राथमिक शिक्षक संघटनेत शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहीलेली मंडळी व माध्यमिक शिक्षणातील प्रयोगशील असलेली मंडळी एकत्रीत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एकत्र आली. अतिशय आनंददायी पद्धतीने हे प्रशिक्षण पार पडले. विद्यार्थी स्वतः शिकू शकतो हे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लक्षात आले. ‘भविष्यवेधी शिक्षण पद्धतीत शिक्षकाने मार्गदर्शक, सुलभक म्हणून आपली जबाबदारी पार पाडायची आहे ही नवी संकल्पना घेऊन प्रत्येक प्रशिक्षणार्थी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवी आव्हाने देऊन भविष्यवेधी शिक्षणाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील’ असे मत गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले. प्रशिक्षणाचे संपुर्ण नियोजन प़ं.स. शिक्षण विभागाच्या सरीता जाधव स्नेहल रावराणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
या पाच दिवशीय प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी पं.स. वैभववाडीचे गट शिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे, कर्मचारी सरिता जाधव, श्रीम.कदम, शिक्षक संघटनेचे शरद नारकर, सुनिल चव्हाण, संजय पाताडे, संतोष मोरे, दिनकर केळकर, मुख्याध्यापक संजय राठोड व तज्ञ मार्गदर्शक तसेच वैभववाडी तालुक्यातील सर्व शाळांतील प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.














