स्वच्छता- रंगरंगोटी- सुशोभीकरण- रोषणाई आणि धार्मिक विधीसाठी गावातील अबाल-वृद्ध-युवाई सरसावली !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साहित्य- कला- क्रीडाचा पारंपारिक वारसा लाभलेल्या करूळ गावचे ग्रामदैवत, श्रीरामेश्वर मंदिर गर्द वनराई आणि प्रसन्न- पवित्र निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. गेल्या अनेक युगांच्या खडतर संघर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर पूर्णत्वास जात आहे. देशपातळीवर केलेल्या आवाहनाला अनुसरून, प्रतिष्ठापना अन् रामजन्मोत्सव मोठ्या भक्ती भावाने आणि धार्मिक विधिने संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर अबालवृद्ध, महिला- पुरुषांनी एकत्र येत ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरात श्रमदान करून साफसफाई, स्वच्छता ,रंगरंगोटी, परिसराचे आणि मंदिरात सुशोभीकरण तसेच विद्युतरोषणाई पूर्ण करून सर्वजण मुख्य सोहळ्यास सज्ज झाले आहेत .
उद्या महत्त्वाच्या जन्मोत्सवाचे निमित्ताने मंदिरात पूजाअर्चा, स्थानीक भजन, हरिपाठ, महाआरतीसह धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. देश पातळीवरील उत्साह करूळ सारख्या ग्रामीण भागातही दिसत असून, एकतेची ऊर्जा या उपक्रमातून ग्रामस्थांनी अनुभवलेली आहे. यामध्ये बाळकृष्ण कर्णिक, विजय कर्णिक, मंगेश कर्णिक ,जितेंद्र दळवी, शिवराम शिंदे, सदानंद शेट्ये ,संजय सरवणकर, सहदेव केसरकर, पुरुषोत्तम तानवडे, बाळकृष्ण शिंदे,प्रकाश गुरव, मधुकर तानवडे, अंकुश तावडे, सहदेव फोपे,चंद्रकांत मेस्त्री, भाऊ सावंत, सूर्यकांत ढवण, शशिकांत शेटे यांचे सह गावातील असंख्य महिला- पुरुष- युवाई यांनी या स्तुत्य उपक्रमात सहभाग घेतला.
















