वागदेतील हायवे रस्त्याचे काम तसेच आंबोलीतील पब्लिक टॉयलेट ची कामे तातडीने पूर्ण करा

खा.विनायक राऊत यांचे दिशा बैठकीत निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) नॅशनल हायवेवरील अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक आज नियोजन भवन मध्ये झाली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.उदय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी विषय वाचन केले. यावेळी प्रधानमंत्री रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत मिशन अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पायाभूत सुविधा, बी. एस. एन. एल. आदीबाबत सविस्तर आढावा खासदार श्री. राऊत यांनी घेतला.

खासदार श्री.राऊत म्हणाले, पूर्ण झालेली आरोग्य केंद्र सर्वसामान्यांसाठी तात्काळ सुरु करावीत. खारेपाटण येथील रस्त्याचे काम सुरू करा. आवश्यक तेथे पोलीसांची मदत घ्या. बी. एस. एन. एल चे टॉवर लवकरात लवकर उभे करावीत. कार्यवाही पूर्ण करावी, आंबोली येथील बस स्थान‌काजवळील सार्वजनिक शौचालयांचे काम महिन्यात पूर्ण करा, संबंधित ठेकेदाराला नोटीस काढा. सावंतवाडी – मालवण येथील कामेही पूर्ण करा. वागदे येथे अपघात होत आहेत तेथील अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.

दिशाच्या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या कार्यालय प्रमुखांविषयी त्यांच्या प्रमुखांना पत्र पाठवून शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत कळवा तसेच खुलासेही मागवा असेही खासदार श्री. राऊत म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!