इ.५वी व इ.८ वीतील प्रत्येकी २५ गुणवंतांचा होणार सन्मान
तळेरे (प्रतिनिधी) : शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी मुलांच्या मनातील भीती दूर करुन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याची प्रेरणा देण्यासाठी रविवारी दि २८ जानेवारी रोजी शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ.नाथ पै सेवागंण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने इ. ५वी व इ. ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तब्बल ३८ केंद्रावर संपन्न झाली असून सुमारे २३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या संख्येने घेतलेली यावर्षीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा आहे.
रविवारी विविध केद्रांवर या परीक्षेला अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळपासून उपस्थिती लावली होती.शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचे सचिव तथा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग माजी विरोधी पक्षनेता नागेंद्र परब यांच्या हस्ते पणदूर केंद्राच्या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचं दीपप्रज्वलन आणि सावित्री फातिमा प्रतिमेला पुष्पहार घालून शानदार उद्घाटन झाले. याप्रसंगी शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर तसेच इतर संघटना पदाधिकारी आणि पालकवर्ग उपस्थित होते.याप्रमाणेच जिल्ह्यातील इतर केंद्रावरही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटने झाली.
शासकीय परीक्षेपूर्वी ही सराव परीक्षा झाल्याने विद्यार्थी,पालक आणि शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल चार दिवसांत जाहीर केला जाणार असून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी मधील प्रत्येकी पहिले 25 यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
तसेच जिल्ह्यातील विविध केंद्रावर उत्कृष्ट कामगिरी बजावत सदरची सराव परीक्षेचे आयोजन, नियोजन अतिशय यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व शिलेदारांचे,बॅ.नाथ पै सेवागंण कट्टा शाखेचे सर्व पदाधिकारी,परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या इतर शिक्षकवृंदांचे,विविध शाळा तसेच शिक्षण संस्थां, मुख्याध्यापक आणि पालकांवर्गाला विशेष धन्यवाद व्यक्त करीत संजय वेतुरेकर यांनी आभार मानले आहेत.