पत्रकारांनी खिलाडू वृत्ती दाखवून एकोपा ठेवावा -जिल्हाधिकारी किशोर तावडे

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पत्रकारांनी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी एकत्रित यावे. त्यात खिलाडू वृत्ती दाखवून एकोपा ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित जिल्ह्यातील पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर जिल्हाधिकारी तावडे यांनी फित कापून आणि नायर यानी श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजींत नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष अतुल काळसेकर, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर, जिल्हा सचिव देवयानी वरसकर, लवू म्हाडेश्वर, गिरीश परब, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, विनोद परब, दत्तप्रसाद वालावलकर, मनोज वारंग, सतीश हरमलकर, तेजस्वी काळसेकर यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यानी मुख्यालय पत्रकार संघाने जिल्हा प्रशासन अधिकारी आणि पत्रकार यांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त केल्या. पोलीस अधीक्षक अग्रवाल यानी पत्रकार नेहमी आपल्या पत्रकारितेच्या कामात व्यस्त असतात. क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पत्रकारांना आपल्यातील खेळाडूवृत्ती दाखविण्यास मिळणार आहे, असे सांगितले. प्रभाकर सावंत यांनी, क्रिकेट खेळताना काही संकेत असतात. बाऊंसर सांभाळून खेळावे लागतात. त्याप्रमाणे पत्रकारांच्या बाऊंसर पासून राजकीय व्यक्तींनी सांभाळून राहावे लागते. पत्रकार आणि राजकारणी यांचा सामना समाज बघत असतो. तो फिक्स असल्यासारखा वाटू नये. तो समाना मनमुराद आनंद देतो. हेच वातावरण कायम राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली. अतुल काळसेकर यांनी पत्रकार, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय व्यक्ती यांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहन केले. मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संदीप गावडे यानी, प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे उपक्रम तसेच स्पर्धा आयोजन मागील उद्देश विषद केले.

error: Content is protected !!