मेथीबेन ही छोटा उदेपूर जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजातील महिला
खारेपाटण (प्रतिनिधी) : मेथीबेन खलियाभाई (वयः५०) या गुजरात राज्याच्या छोटा उदेपूर जिल्ह्यातील महिलेचे तब्बल १६ वर्षांनतर कुटुंब पुनर्मिलन घडवून आणण्यात संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांना नुकतेच यश आले असून श्रीम.मेथीबेनला घरी नेण्यासाठी तिचा पती खलियाभाई व मुलगा तुलशीभाई यांचेसहृ केवाडीचे सरपंच दुभिल दादानियाभाई रामसिंग,तलाठी निश्चितभाई व अन्य ५ ग्रामस्थ संविता आश्रमात आले होते.
१६ वर्षांपुर्वी मेथीबेन ही मु.कुंडा ,ग्रामपंचायतः केवाडी, ता.नसवाडी जि.छोटा उदेपूर (पुर्वीचा जिल्हाःवडोदरा) येथून मानसिक आजारी अवस्थेत घरातून बाहेर पडली. आणि चार पाच वर्षानंतर थेट ९५० किलोमीटर दूर असलेल्या कुडाळ येथे पोहचली.१९ आँगस्ट,२०१३ रोजी कुडाळ बाजार पेठेत मनोरूग्ण व निराधार स्थीतीत आणि अत्यंत बिकट अवस्थेत मेथीबेन आढळून आली. कुडाळ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब व त्यांचे सहकारी सौ.सावंत मँडम, गौरी व उषा सुपल यांनी तीला सविता आश्रमात दाखल केले.
आश्रमातील स्टाफने केलेली सेवा सुश्रूषा आणि मानसोपचारतज्ञ डाँ.धुरींच्या उपचारांनी मेथीबेन हळूहळू पुर्ण बरी झाली. स्वभावाने मितभाषी असलेल्या मेथीबेनची गुजराती, मराठी व भिल्ल मिश्रीत भाषा समजण्यास अडचण येत होती. मेथीबेनने सांगीतलेल्या माहितीवरून संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांचेसह माधव पाटिल, भक्ती परब , डिसूझा व जानकी आंगणे यांच्या टिमने अनेक प्रयत्नांनी गुगलद्वारे तीचे गाव शोधून कुटुंबियांशी संपर्क करण्यात यश मिळविले.
तब्बल साडेदहा वर्षे संविता आश्रमात राहिलेल्या व स्वभावतः शांत , मनमिळावू , मायाळू व कष्टाळू असलेल्या मेथीबेनचे कुटुंबाप्रमाणे येथली माणसं प्राणी आणि निसर्गाशी आपुलकीचे नाते जडले होते. ती तीच्या स्वतःच्या कुटुंबात जात असताना संविता आश्रम कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद आणि विरहाचे संमिश्र अश्रू तरळले होते. मेथीबेन ला निरोप देते वेळी आश्रमचे देवू सावंत, महाबळेश्वर कामत,आशिष व विजया कांबळी, प्रसाद आंगणे , आरती वायंगणकर, लीना पालकर , सुवर्णा कोकरे, नरेश आंगणे, प्रतिक्षा चव्हाण यांचे सह आश्रमातील सर्व स्टाफ आणि बांधव उपस्थीत होते.

















