सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : चुलत वहिनीचा खून केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. आरोपी संजय मेस्त्री याने आपली चुलत वहिनी चैताली निलेश मेस्त्री हीचा गळा आवळून खून केला होता. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी संजय मेस्त्री याने जामीन मंजूर होण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली. सरकारी वकील देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आरोपी संजय मेस्त्री याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे, त्याला जामीन मिळाल्यास तो भूमिगत होऊन खटल्याकामी कोर्टात हजर राहणार नाही, साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, मयत चे नातेवाईक आणि आरोपी नातेवाईक असून त्याच्यापासून मयताच्या वृद्ध पालकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका होऊ शकतो. सरकारी वकील देसाई यांच्या युक्तिवादानंतर आरोपी संजय मेस्त्री याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला.












