सत्तरी उलटलेल्या फोंडा हायस्कूलच्या स्नेह्यांचा स्नेह-सोहळा उत्साहात !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : ” आठवणी, गतजीवन जगायचंय, अन् पुन्हा एकदा शाळेत जायचय —आयुष्याच्या हिंदोळ्यावर खट्याळपणा करायचाय ! ” आपलं माध्यमिक शिक्षण संपलं की प्रत्येकाच आयुष्य चौफेर उधळत –वाटा बदलतात– परंतु ज्या शाळेत आपण शिकलो, त्याची आठवण आपल्या जीवनात अविस्मरणीय असते. ते शिक्षण, शिक्षक, त्यांची शिकवण्याची पद्धत, वर्गातील खट्याळपणा,ग्राउंड वरील दम लागेपर्यंतची कवायत, झालेल्या शिक्षा आणि त्यानंतर आपण केलेला अभ्यास ! मागे वळून पाहता— “पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा ! ” आपल्या जीवनात किती मोठं करून गेले हे आज सत्तरी उलटल्यानंतर कळतं. मात्र खंत लागून राहते ती आजच्या शिक्षण पद्धतीची ! रोज बदलणारे नियम, अध्यादेश, शिक्षकावरील संस्थाचालकांचा वचक आणि पुढच्या वर्गात उत्तीर्ण करण्याचे आदेश– त्यात मोबाईल आणि सोशल मीडिया, यामुळे संस्कारक्षम शिक्षणमूल्य कमी झाल्याची खंत वाटते. पूर्वी वर्गात गरीब- श्रीमंत दरी नसे. शेतकरी, व्यापारी, कातकरी, आणि सर्व धर्मीय एकाच बाकावर बसत.आणि शिक्षण घेत.ही बाब भावी पिढीला, पालक, शिक्षक, आणि मुलांना सदैव मार्गदर्शक ठरावी– असे मनोगत प्रा. प्रकाश पार्सेकर यांनी व्यक्त केले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या १९७० च्या वर्गातील सवंगडी एकत्र जमले होते. त्यांच्या स्नेहसोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली .यावेळी स्नेहसोहळ्याचे प्रवर्तक स्व.मोहन सामंत आणि स्व. विजयकुमार पत्की यांची आठवण काढून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर झालेल्या गप्पागोष्टी मध्ये ” आठवणींच्या झोपाळ्यावर—” सर्वांनी आपल्या आठवणींना उजाळा देत मनमोकळे केलं. यावेळी श्रीकृष्ण रेडकर या शेतकरी कुटुंबातील मित्राने, शाळेतील शिक्षण अनवाणी, खडतर आणि प्रामाणिक असल्याचा निर्वाळा दिला. त्यावेळेसचे गुरुजन– ” नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर !” या क्लुप्तीने तितकेच शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांना सर्वस्व मानणारे असे होते. डॉ. तुळशीराम रावराणे यांनी,जरी आपण सत्तरी पार केली असली तरी, मन सुदृढ आणि सकारात्मक ठेवू या. योगा करू या. ज्याने मन आणि शरीर आनंदी आणि तणाव मुक्त राहील असे सांगितले.विजय नांदोडकर अलका पारकर, प्रतिभा सापळे यांनी शालेय गमती जमती चे किस्से सांगून रंगत आणली.
महिलांनी हळदीकुंकू चा आनंद लुटला.या सोहळ्याला श्रीकृष्ण रेडकर, अनिल पटेल, कीर्तीवान रावराणे, डॉ.तुळशीराम राणे, प्रकाश पार्सेकर, मेजर गोविंद पेडणेकर, अनंत जोईल, मोहन साळवी, सुरेश राणे, बाळकृष्ण मुरकर अलका पारकर, प्रतिभा सापळे, सौ. नांदोडकर,सौ.रेडकर, सौ.मूरकर इत्यादी सवंगडी उपस्थित होते. आभार विजय नांदोडकर यांनी मानताना, सर्वजण भाऊक झाले. आणि “म्हणूनच अजूनही आठवते ती ? माझी शाळा !” या सकारात्मक विचारावर पुन्हा भेटू– असे म्हणत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.












