चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकची महसूल विभागाकडून फोंडाघाट मध्ये तपासणी

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, फोंडाघाट मंडळ अधिकारी योजना सापळे व टीमची कारवाई.

ओव्हरलोड चिरे वाहतुकीवर २८ हजारांचा दंड

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली, ग्रामस्थांच्या तक्रारीवरून, फोंडाघाट मंडल अधिकारी योजना सापळे आणि तलाठी डाके आणि लांबर तसेच चेक पोस्टवरील पोलीस यांच्या टीमने, फोंडाघाट चेक पोस्ट येथे वाहतूक करणाऱ्या सुमारे १२ ट्रक्स ना थांबवुन तपासणी केली. यावेळी वाहतुकीचे कागदपत्र- पास इत्यादी तपासले असता, दोन ट्रकमध्ये पासावरील चिरेब्रास पेक्षा जादा चिरे भरल्याचे आढळल्याने, त्यांना रुपये २८१५०/- एवढा दंड आकारण्यात आला.

गेले अनेक दिवस घाटमाथ्यावर जाणाऱ्या ट्रक्समध्ये ओवरलोड चिरे-वाळू कडे डोळेझाक करून बिनधास्त वाहतूक होत आहे. शिवाय खाणी वर आपला नंबर लवकर लागावा, यासाठी घाट माथ्यावरून खाणींकडे येणारे ट्रक सुसाट वेगात, घाट पार करून गावाच्या बाजारपेठेतून जातात. यामुळे अपघातही घडले आहेत. या बद्दल तक्रार करून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई सोडाच, परंतु थातूरमातूर उलाढाल होऊन चेक पोस्ट वरून गाड्या पास होतात. त्यामुळे चेक पोस्ट वरील पोलीस काय करतात ? असा सवाल ग्रामस्थांमध्ये विचारला जात आहे. आजच्या चेक पोस्टवरील महसूल विभागाच्या कारवाईमुळे या बेकायदेशीर प्रकारांना आणि गाड्यांच्या वेगाला आळा बसेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे..

error: Content is protected !!