दुचाकिसह तिघांना केली अटक ; दोन दिवस वनकोठडी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : वन हद्दीत जावून भेडले माडाची पाने तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने उत्तर प्रदेश येथील तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई आज सकाळी कुणकेरी जंगलात करण्यात आली. नईम सलमानी (वय २७), अनिल भार्गव (वय २१) आणि रिजवान सलमानी (वय २५) तिघे राहणार उत्तर प्रदेश अशी त्यांची नावे आहे. दरम्यान त्या तिघांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची वनकोठडी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर त्यांच्या टीमसह जंगलतपासणी करीत असताना जंगलामध्ये जागोजागी भेडल्यामाड झाडांची तोड करून पाने गोळा केला असल्याचे दिसून आले. या तोडीचा कानोसा घेत आरोपींचा तपास केला असता काही अज्ञात इसम जंगलामध्ये विळ्याच्या सहाय्याने भेडल्यामाडाची तोड करुन, पानांचे ढीग बांधत असल्याचे दिसून आले. फिरते पथक वनपाल मधुकर काशिद, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, दत्तात्रय शिंदे, धनंजय यादव यांनी मोठ्या शिताफीने आरोपींवर झडप घालून ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या तीन आरोपींची चौकशी केली असता तिन्ही आरोपी हे परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींच्या सोबतच दोन मोटारसायकली देखील ताब्यात घेण्यात आल्या. या आरोपींना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने वैभव चव्हाण यांनी तर वन विभागाच्या वतीने वनक्षेत्रपाल फिरते पथक मदन क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.ही कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी तसेच सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली फिरतेपथक सावंतवाडी टीमने यशस्वीरित्या पार पाडली.












