कणकवली सा.बां.शासकीय विश्रामगृह येथे बॅ.नाथ पै यांच्या तैलचित्राचे झाले अनावरण
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम
कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे करण्यात आले वाटप
कणकवली(प्रतिनिधी) : बॅरिस्टर नाथ पै यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. समाजवादी चळवळ काळाच्या ओघात मागे पडली तरी बॅरिस्टर नाथ पै यांनी दिलेले विचार समाजात कायम राहतील.बॅरिस्टर नाथ पै यांच्या विचार व कार्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.त्यांच्या आदर्शवत कामाचा धडा येणाऱ्या पिढीने गिरवला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून भारत देश समृद्ध आणि प्रगतशील बनविण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाट उचलावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले.
बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे बॅरिस्टर नाथ पै यांच्या तैलचित्राचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित आदरांजली वाहण्याचा कार्यक्रमात कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपकार्यकारी अभियंता के.के. प्रभु, उपअभियंता विनायक जोशी, श्रीनिवास बासुतकर सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम, शाखा अभियंता शुभम दुडीये, शासकीय ठेकेदार अखिल पालकर तसेच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य संतोष राऊळ,महेश सरनाईक, कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अजित सावंत, पत्रकार रवी गावडे, विलास कुडाळकर, तुषार हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वगोड म्हणाले, कोकणला बॅ. नाथ पै व मधू दंडवते यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. हा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे नेला पाहिजे, बॅ. नाथ पै यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते, त्यांचे हे स्वप्न पूर्ण मधू दंडवतेनी केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात चांगले काम करणारे अधिकारी व कर्मचारी असून सा.बां.विभागाकडून जनतेच्या खूप अपेक्षा असून त्या आमचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
उमेश तोरसकर म्हणाले, राज्यकर्ते व अधिकारी यांच्याकडे व्हिजन असले पाहिजे त्यांनी व्हिजन ठेवून काम केल्यास देशाचा कायापालट होण्यास फार वेळ लागणार नाही. बॅ. नाथ पै यांचे समाजवादी विचार हे सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे. साबांविच्या अधिकारी व कर्मचान्यांनी जनसेवाला प्राधान्य देऊन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संतोष कदम म्हणाले, बॅ. नाथ पै व मधू दंडवते यांच्या सामाजिक कार्याचा वसा सर्वानी जपला पाहिजे. राज्यकर्ते व अधिकाऱ्यांनी बहुजन हियात, बहुजन सुखाय या पद्धतीने काम केले पाहिजे.
पत्रकार संतोष राऊळ यांनी, बॅ. नाथ पै यांच्या जीवनप्रवास थोडक्यात सांगून त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले.तर बांधकाम विभाग म्हणजे माती, खडी,वाळू आणि डांबर एवढाच पुरती मर्यादित नाही तर या ठिकाणी काम करणारा प्रत्येक माणूस हा समाजाशी आणि येथील मातीशी जोडलेला आहे.त्याच्यातली समाजसेवक जागृत करण्याचे काम कार्यकारी अभियंता श्री सर्वगोड करत आहेत.शुभम दुडिये व विनायक मेस्त्री यांनी आपल्या मनोगतातून बॅ. नाथ पै यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजयकुमार सर्वगोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाची धुरा स्वीकारल्यानंतर चौकटीच्या बाहेर काम करत विविध उपक्रम हाती घेतल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतूक केले. आरंभी शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेश कक्षासमोर बॅ. नाथ पै यांचे तैलचित्र बसविण्यात आले आहे. याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरणाचे काम अखिल पालकर यांनी चांगल्यापद्धतीने केल्याबद्दल त्यांचा साबांवितर्फे सत्कार करण्यात आला. तसेच रस्ता सुरक्षितता अभियानांतर्गत साबांवितर्फे काही जणांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद कासार्डेकर यांनी केले.