फोंडाघाट (प्रतिनिधी) : तासगाव हून कासार्डे च्या दिशेने जाणारा टिपर ( MH 10 – DZ – 3966 )पियाळी बौद्धवाडी येथे पलटी झाला. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी टिपर चे नुकसान झाले आहे. अपघातस्थळी टिपर चालक स्वप्नील तानाजी जाधव ( रा.चिंचणी, ता.तासगाव, जि. सांगली ) याने दिलेल्या माहितीनुसार टिपर चालक स्वप्नील हा सिलिका वाळू भरण्यासाठी फोंडाघाट पियाळी मार्गे तळेरेच्या दिशेने जात होता.पियाळी बौद्धवाडी येथे धावत्या टिपर ची स्टेपनी तुटून रस्त्यावर पडली. पडलेल्या स्टेपनी वरून टिपर ची मागील चाके जाऊन चालक स्वप्नील चे नियंत्रण सुटून टिपर रस्त्यालगत पलटी झाला. या अपघातात चालक स्वप्नील याला जखम झाली नसली तरी टिपर चे नुकसान झाले आहे. दरम्यान या अपघाताची पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नव्हती.














