आचरा (प्रतिनिधी) : आडवली येथे सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेला शिवजन्मोत्सव जणू काही शिवकाळात घेऊन जाणारा होता. भगव्या पताका, पारंपारिक वेशभुषा, जय भवानी-जय शिवरायचा जयघोष, वारकरी दिंडी, शिवचरित्राधारीत देखावे, लेझीम नृत्य, पालखीसोहळा, महाराजांची विधीवत पूजा, पवित्र जलाभिषेक, प्रत्यक्ष शिवजन्म सोहळा, पाळणा-अंगाईगीते, महाआरती, ध्येयमंत्र-प्रेरणामंत्र, गारद, सत्कार समारंभ, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा, पोवाडा सादरीकरण स्पर्धा, दीपोत्सव यामुळे अगदी भक्तीमय, शिवमय वातावरण उपस्थित सर्व शिवप्रेमींनी याची देही याची डोळा अनुभवला.
सकाळच्या सत्रात बाळगोपाळ मित्रमंडळ, आचरा वरची चावडी यांचे शिवगीते आणि शिवचरित्राधारीत देखावे यामुळे कार्यक्रमाची सुरुवातच भक्तीमय वातावरणात झाली. आडवली तिठा येथे पालखी मिरवणूक आल्यानंतर रिंगण करत वारकरी नृत्य सादर करत आचरा वरची चावडी येथील बाळगोपाळ मित्रमंडळाने उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. आडवली नं 1 च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने तसेच अफझलखानाच्या वधाच्या देखाव्याचे सर्वांनीच कौतुक केले.
पालखी मंडपात येताच सुहासिनींच्या हस्ते पालखीचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर यावर्षीचा महाराजांच्या पूजेचा मान ज्यांना देण्यात आला होता त्या मंगेश सखाराम यादव आणि मीरा मंगेश यादव यांनी पालखीला खांदा देत पालखी पुजास्थळी आणली. तदनंतर रायगड, राजगड, तोरणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पंढरपूर, गाणगापूर येथून आणलेल्या पवित्र जलाने महाराजांवर अभिषेक करण्यात आला. महाराजांच्या पूजनानंतर महिलांच्या हस्ते शिवजन्म साजरा करण्यात आला. यावेळी सौ. मीनाक्षी कपिल मेस्त्री यांनी पाळणागीत व अंगाईगीत सादर करत उपस्थितांना शिवकाळात घेऊन गेल्या. त्यांना विश्राम घाडी यांनी संगीतसाथ दिली. सामूदायिक महाआरती नंतर कु.अथर्व तुळपुळे याने ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणत वातावरण भक्तीमय केलं. तसेच सनराईजच्या कु. प्रणय चव्हाण याने गारद म्हणत आसमंत दणाणून सोडला. ‘आमचे बाळराजे जन्माला आले’ म्हणत छोट्या मावळ्यांनी घुगरे आणि पेढे वाटून आनंदच साजरा केला. या संपूर्ण वातावरणात अजून भर पडली ती शिवकालीन वेशभूषा स्पर्धेच्या निमित्ताने छोट्या मुलांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या सादरीकरणाची. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध निवेदक राजा सामंत यांनी केले. त्यानंतर मंगेश यादव, सौ. मीरा मंगेश यादव, गं.भा. लक्ष्मी नारायण राऊळ यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात तिन्ही सांजेच्या समयी महाराजांच्या चरणाशी दीपोत्सव करण्यात आला. यावेळी संपूर्ण मंडप दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात न्हावून निघाला होता. त्यानंतर महाआरती होऊन शिवजन्मोत्सवाची सांगता झाली.या शिवजन्मोत्सवासाठी सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश मालंडकर, उपाध्यक्ष तुषार चव्हाण, मिलिंद चव्हाण, रूपेश गुरव, सुबोध चव्हाण, सर्वेश मेस्त्री, प्रणय चव्हाण,छोटू परब, महेश राऊळ, अनिकेत राऊळ, वेदांत लाड, तेजस परब यांनी मेहनत घेतली. सुप्रसिद्ध निवेदक राजा सामंत यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद चव्हाण यांनी आभार मानले.













