पावसाळ्यात मोहिमेत शेकडो शिवभक्तांची मुक्कामाची सोय होणार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड परिसराचा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. याच परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाठीच्या एकछत्र योजनेंतर्गत पावनखिंड मार्गावर मुक्कामाच्या तीन गावांमध्ये विश्रामगृह बांधण्यासाठी 14 कोटी 94 लाख 45 हजारांचा निधी सांस्कृतिक कार्य विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या विश्रामगृह उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
पन्हाळगड ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंती करणाऱ्या शिवभक्तांकरीता शाहूवाडी तालुक्यात खोतवाडी, करपेवाडी, पांढरेपाणी या तिन्ही ठिकाणी मुक्कामासाठी सुसज्ज हॉल उभारले जातील. करपेवाडी आणि पांढरेपाणी येथे सुमारे ५५० स्त्री व पुरुष शिवभक्त मुक्काम करतील, अशी व्यवस्था असेल. हॉलमध्ये पुरेशे स्वयंपाक गृह, स्वच्छतागृहे, भोजन हॉल व्यवस्था असेल. खोतवाडी गावात सुमारे २२५ शिवभक्त राहतील, अशी व्यवस्था असेल. वरील सर्व हाॅलचा दर्शनी भाग ऐतिहासिक इमारतीस साजेसा असेल. तसेच पन्हाळा-पावनखिंड मार्गावर पदभ्रमंती करणारे शिवभक्तांकरीता मार्गदर्शनाकरिता दिशादर्शक फलक, माहिती फलक तसेच मार्गावरील गावाच्या शेजारी स्वच्छतागृह बांधणे, तसेच मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी सुमारे ४० फूट उंचीचे ध्वजस्तंभ उभारणे तसेच ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करता पाणपोई व आंबेवाडी येथे प्रगतीवर असणारे हॉल शेजारी स्वयंपाकगृह बांधण्यात येईल. शिवभक्तांची पावनखिंड मार्गावर भर पावसाळ्यात मुक्कामाची व्यवस्था व्हावी, यासाठी शिवराष्ट्र परिवारचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार खासदार धैर्यशील माने, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे समन्वयक युवराज काकडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार हा प्रस्ताव मार्गी लागला.
पावनखिंड मार्गावर ऐतिहासिक फलक
पन्हाळगड पावनखिंड मार्गावर एकूण सहा ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाणार आहे. दहा ठिकाणी फ्लॅगपोस्ट, 70 ठिकाणी साईनबोर्ड उभे केले जाणार आहे. यामध्ये पावनखिंड रणसंग्राम इतिहासाविषयीची फलकांचा समावेश असणार आहे.यापूर्वीच या प्रस्तावाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आता निधीही उपलब्ध झाल्याने या विश्रामगृहाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.
प्रत्यक्ष मोहिमेतून मागणी मार्गी
शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी 15 जुलै 2023 रोजी आयोजित केलेल्या शिवमोहिमेत खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मंगेश चिवटे आणि युवराज काकडे यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर येथे आवश्यक असलेल्या सर्व कामांची माहिती घेऊन येथील विकास कामांचा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली. मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे आणि युवराज काकडे यांनी शासन आणि प्रशासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले.
पन्हाळा-पावनखिंड रणसंग्राम
पन्हाळा-पावनखिंड रणसंग्राम म्हणजे अंगावर रोमांच उभा करणारा शिवचरित्रातील महत्त्वाचा रणसंग्राम आहे. शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रोजी भरपावसाळ्यात रात्री किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पन्हाळ्याच्या पश्चिमेस साधारणतः 60 किमी अंतरावर असलेल्या खेळणा म्हणजेच विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. धो-धो कोसळणारा पाऊस, त्यात आपल्या शरण येण्याच्या नाटकामुळे वेढ्यात तयार झालेली ढिलाई याचा त्यांना फायदा निश्चितपणे उठवता आला. पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या एका वाटेने ते 600 मावळ्यांसह बाहेर पडले. तरीही या मोहिमेची चाहूल सिद्दी जौहरला लागलीच.
सिद्दी जौहरने त्यांना थांबवण्यासाठी मोठं पायदळ पाठवलं. सुरुवातीला त्यांनी शिवा काशीद या महाराजांसारख्याच दिसणाऱ्या मावळ्याला पकडले. मात्र हे खरे महाराज नाहीत, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला. शिवाजी महाराजांनी विशाळगडावर जाऊ नये, यासाठी वाटेत शृंगारपूरचे सुर्वे नेमले होतेच. हे अडथळे तसेच एकीकडे कोसळणारे अस्मानी आणि पाठलाग करणारी सुलतानी संकट पार करत त्यांना विशाळगडावर पोहोचायचं होतं. अखेर सिद्दीच्या सैन्याला रोखण्यासाठी एके ठिकाणी त्यांना थांबावंच लागलं. पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत बाजी प्रभू देशपांडे यांचे हिरडस मावळातील आणि इतर सैन्य सिद्दी जौहरच्या सैन्याला रोखण्यासाठी थांबले आणि तिकडे शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले. या लढाईत बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू, बांदल सेनेने आपल्या असीम शौर्याचं दर्शन घडवलं.













