आंबोली चौकुळमधील अन्य अवैध बांधकामे तोडा

भाजपा पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथे अतिक्रमणावर महसूल व वन विभागाकडून झालेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, अशीच कारवाई आता आंबोली व चौकुळ येथे महाराष्ट्र शासन म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत त्यावरही तत्परतेने व्हावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केले.

दरम्यान, या निवेदनाची त्वरीत दखल न घेतल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा यावेळी चराठा उपसरपंच अमित परब यांनी दिला.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आंबोली येथील वनसंज्ञा उल्लेख असलेल्या परंतु वहिवाट असलेल्या जमिनीवरील बंगल्यांच्या बांधकामावर आपण तत्परतेने केलेली कारवाई यासाठी आपण नक्कीच अभिनंदनास पात्र आहात. या भागात खाजगी वने, वनसंज्ञा जमिनीवर शेकडो बांधकामे झालेली आहेत. याबाबतचे कायदेशीर पुरावे आम्ही आपल्या कार्यालयात येत्या दोन दिवसात सादर करू मात्र पुरावे दिल्यानंतर त्याच तत्परतेची कार्यवाही तुमच्याकडून अपेक्षित आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी अमित परब म्हणाले, कालच्या कारवाईत चार बंगल्यांचे ग्रामपंचायत आंबोली यांनी नंबरही दिले होते. तरी देखील अगदी तत्परतेने ४८ तासात प्रशासनाने कारवाई केली. त्याचबरोबर आंबोली, चौकूळ येथे शासनाची नोंद असलेल्या म्हणजे वने, खाजगी वने, वनसंज्ञा जमिनीवर बांधकामे झालेली आहेत. याबाबतही महसूल व वनविभाग तेवढीच तत्परता दाखवणार का असा त्यांनी उपस्थित केला.

सदरचे बांधकाम पाडण्याअगोदर ज्या प्रकारे तुम्ही न्यायालयाकडे कॅव्हेट दाखल केले. तसेच यापुढेही जी कारवाई आपण आम्ही दिलेल्या पुराव्यावर करणार त्यावेळी असेच कॅव्हेट कोर्टात सादर करावे. म्हणजे आपल्या चांगल्या व प्रामाणिक हेतुबद्दल कुणाच्याही मनात शंका राहणार नाही, असेही अमित परब यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी नगरपालिका सभापती सुधिर आडिवरेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजपा पदाधिकारी अजय सावंत, केतन आजगावकर, विनोद सावंत, निशांत तोरसकर, प्रफुल्ल गोंदावळे, क्लेटेस्ट फर्नांडिस, सचिन बिरजे, रफिक शेख आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!