दिक्षा चव्हाणने घडविला इतिहास ; महाराष्ट्र राज्य संघाचे करणार नेतृत्व
कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा कार्यकारी अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,तुकाराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. सदर स्पर्धा विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल डेरवण, सावर्डे, ता. चिपळूण येथे संपन्न झाली.
सदर स्पर्धेत दिक्षाने अप्रतिम कॅरम खेळाचे प्रदर्शन करत उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या मधुरा देवळे हिचा १६-६, २१-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत तिने पुण्याच्या ज्ञानेश्वरी इंगुळकर हिचा १८-८, ६-१४, २१-३ असा पराभव केला. अंतिम फेरीत तिने सावंतवाडीच्या प्रणिता आयरे हिचा १६-६, १८-९ असा सरळ सेटमध्ये पराभव करत १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्र राज्याचे विजेतेपद पटकावले व वाराणसी येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचा कप्तान बनण्याचा मान मिळवून इतिहास घडविला. यापूर्वी सुद्धा दिक्षाने राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत दोनवेळा महाराष्ट्र राज्याला सांघिक रौप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली आहे.
त्याचप्रमाणे १४ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रशालेत इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कुमारी श्रेया राजेंद्र महाडिक हिने सुद्धा निपुण कॅरम खेळाचे कौशल्य दाखवून सदर स्पर्धेत आठवा क्रमांक पटकावला व नॅशनल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात राखीव खेळाडू म्हणून आपला सहभाग निश्चित केला.
सदर यशस्वी विद्यार्थिनींची वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना क.ग.शि.प्र.मंडळ,मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कु. दिक्षा व श्रेया यांना प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक व कॅरम राज्य प्रशिक्षक मकरंद आपटे, क्रीडा शिक्षक बयाजी बुराण व जिल्ह्यातील नामवंत कॅरम खेळाडू गौतम यादव यांचे मार्गदर्शन लाभले.