विद्यार्थ्यानी गुणवत्ता कायम टिकवावी :- संजय वेतुरेकर

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे शिष्यवृत्ती गुणवंताचा सत्कार संपन्न

कासार्डे (प्रतिनिधी) : शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे संपन्न झाला. याप्रसंगी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन म्हणाले की, अडीच हजार मुलांमधून आपण गुणवत्ता सिध्द केली आहे हे कौतुकास्पद आहे. ही गुणवत्ता आगामी काळात टिकवून ठेवणे आवश्यक असून त्या गुणवत्तेसोबतच आपण भारताचे भावी सुजाण नागरिक आहात याची जाणीव ठेवून सर्वानी आपले वर्तन करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.

समविचारी संस्थांचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम -दीपक गोगटे

प्रारंभी सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यांनी आजचा दिवस तुकाराम बिजेचा असून जगद्गुरु तुकारामाचे विचार आजही महत्वपूर्ण आहेत. या सराव परीक्षेला २४५० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ५३ विद्यार्थ्याना याठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे. शिक्षक भारती व बॅ नाथ पै सेवांगण या समविचारी संस्था असून आगामी काळात अनेक शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा मनोदय ही त्यांनी व्यक्त केला. शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय नाईक यांनी गेली दहा वर्षे सेवांगण सोबत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे, कट्टा परिसरात शैक्षणिक गुणवता वाढली आहे.

यापुढेही,असेच उपक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त करीत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कला शिक्षक समिर चांदरकर यांनीही विद्यार्थ्यांना मौलीक मार्गदर्शन केले अभ्यासा सोबत इतर कला गुणांचा विकास होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत असं ते म्हणाले. महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण यानीही गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून आपली गुणवत्ता वाढवावी असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसाद परुळेकर यानी केले. यावेळी वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय नाईक व कलाशिक्षक समिर चांदरकर यांचा किशोर शिरोडकर व संजय वेतुरेकर यांचे हस्ते शाल-श्रीफळ व चंदनाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला.

५३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

इयत्ता ५वी तील २६ व ८वी तील २७ मुलांचा भेटवस्तू, सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गुणगौरव करण्यात आला. सत्कार सोहळ्याला व्यासपीठावर संजय वेतुरेकर,किशोर शिरोडकर, संजय नाईक, प्रसाद परुळेकर,समीर चांदरकर, बापू तळावडेकर, शाम पावसकर, दीपक भोगटे, प्रशांत आडेलकर, समीर परब, चंद्रकांत चव्हाण, सुश्मिता चव्हाण, विद्या शिरसाट, बाळकृष्ण वाजंत्री, अनिकेत वेतुरेकर, जनार्दन शेळके, रुपेश कर्पे, रामचंद्र पिकुळकर, विवेकानंद जोशी, एड.
रामनाथ बावकर, सुधीर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याला जिल्हाभरातील विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!