सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : अखेर महायुती च्या उमेदवारी ची माळ सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य उद्योजक किरण सामंत यांच्या गळ्यात पडली असून धनुष्यबाण या निशाणीवर किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मागील महिनाभर तळकोकणात महायुती चा उमेदवार कोण असणार या प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला असून शिवसेना शिंदे गटाला किरण सामंत यांच्या रुपात तळकोकणची उमेदवारी मिळाली आहे. भाजपा आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षाकडून या जागेवर दावेदारी केली जात होती. दोन्ही बाजूचे नेते आपली दावेदारी कशी सुयोग्य याचे स्पष्टीकरण देतानाच शेवटी महायुती चा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणणार असे सांगत होते. भाजपकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे, प्रमोद जठार, यांची नावे तर शिवसेनेकडून एकमेव किरण सामंत यांचेच नाव चर्चेत होते. या चर्चेला आता फुल स्टॉप लागला आहे. ठाकरे शिवसेनेच्या वतीने विनायक राऊत यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली तरीही महायुती चा उमेदवार निश्चित होत नव्हता. लोकसभा उमेदवारी चे प्रबळ दावेदार असलेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळाल्याचे 28 मार्च रोजी सकाळीच टीव्ही चॅनेलवर दाखवले जात होते. तळकोकण चा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपाच्या पारड्यात गेला असून उमेदवार म्हणून केंद्रीयमंत्री राणेंच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची बाकी असल्याचे वृत्त झळकताच सिंधुदुर्गात भाजपाच्या शक्तिकेंद्र निहाय व्हाट्सप ग्रुपवर जल्लोषाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र याबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते. अखेर हा सस्पेन्स संपला असून महायुती चे उमेदवार म्हणून किरण सामंत हे विनायक राऊत यांना टक्कर देणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.