वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी 10 महिने कैदेसह 2 हजार रुपये दंड

सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून विजवीतरणचे कर्मचारी विद्याधर बाबाजी नाईक यांच्या गाडीसमोर स्वतःची गाडी लावून अडवून त्यांच्या कानाखाली हाताने मारून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात आरोपी नेल्सन थॉमस डॉंटस ( वय 27, रा. कोलगाव ता सावंतवाडी ) याला जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी 10 महिने साधी कैद व रोख रु 2 हजार असा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा यशस्वी तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला सहाय्यक पोलीस अधिकारी श्रीमती आर बी मोमीन यांनी केला होता. आरोपी नेल्सन याने आपला वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून विजवितरण चे कर्मचारी विद्याधर नाईक यांच्या दुचाकी समोर आपली मोटरसायकल आडवी लावून त्यांना अडवले. त्यानंतर नेल्स न याने हाताने फिर्यादी विद्याधर नाईक यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करून त्यांच्या कानाखाली मारले.तसेच साक्षीदार विजवीतरण कर्मचारी पंडित कुंभार यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली होती. ही घटना 23 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी कोलगाव मारुती मंदिरनजीक घडली होती. याबाबत विद्याधर नाईक यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नेल्सन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटलयाची सुनावणी होत असताना सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल आरोपी नेल्सन विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट ही बजावण्यात आले होते. सरकारी अभियोक्ता देसाई यांनी आरोपी विरोधात दाखल असलेले हाफ मर्डर सह आयपीसी च्या अन्य कलमानुसार गंभीर गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या खटल्यात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर आरोपी नेल्सन याला जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस.देशमुख यांनी आयपीसी 341 नुसार 1 महिना साधी कैद 500 रु दंड व दंड न भरल्यास 7 दिवस साधी कैद, आयपीसी 506 खाली 6 महिने कैद व 1 हजार दंड , दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद आणि आयपीसी 352 खाली 3 महिने कैद व 500 रु दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!