मुंबई (ब्युराे न्युज) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव, शिर्डीत सदाशिव लोखंडे, दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या शिवसेना उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने दावा सांगितला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांबाबत चर्चा सुरु होती. शिवसेनेकडून देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता. त्यामुळे याठिकाणच्या जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी भर कार्यक्रमात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. पण त्यावरुन भाजपमध्ये नाराजी दिसून आली होती. या सर्व घडामोडींनंतर आज शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत.