ऍड. उमेश सावंत, ऍड.संग्राम देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कनेडी येथे झालेल्या राड्या मध्ये अटक करण्यात आलेल्या 10 संशयित आरोपींना अखेर तब्बल 17 दिवसांनी सशर्थ जामीन मंजूर झाला आहे. सुरुवातीला या आरोपींना पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र न्यायालयीन कोठडीत बरेच दिवस हे आरोपी जामिनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर त्यांना आज शुक्रवारी प्रत्येकी 15 हजारांचा सशर्थ जामीन मंजूर झाला. यामध्ये 307 च्या गुन्ह्यातील कुणाल सावंत, योगेश वाळके, योगेश सावंत तर 353 च्या गुन्ह्यांमधील संतोष आंग्रे, संदीप गावकर, अनिल पांगम, तुषार गावकर व 307 च्या दुसऱ्या गुन्ह्यात श्रीकांत सावंत, निखिल आचरेकर, राजेश पवार यांना अटक करण्यात आले होते. यातील संदीप गावकर याला ३०७ च्या गुन्ह्यात पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते. तर मंगेश सावंत याला 353 च्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले होते.
या संशयीत आरोपींना 7 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना आज तब्बल 17 दिवसांनी सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला. या करिता काही संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला. तर काहींच्या बाजूने ऍड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. साक्षीदारांवर दबाव न आणणे, तपास कामात सहकार्य करणे आदि अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे, बापू खरात यांनी केला.