पालकमंत्र्यांकडून सुचविलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी शिवसेना भाजपातील दुफळी केली उघड
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा असल्याने यावेळी या मतदार संघात सेनेचाच उमेदवार असेल अशी आशा होती. मात्र ही जागा भाजपा कडे गेल्याने जिल्ह्यातील शिवसेना( शिंदेगट) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच आपल्या पक्षाचा वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराबाबत अद्याप कोणतेही निर्देश दिले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यातील अनेक प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधूनही त्यांनी युतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोपही शिंदेसेनेचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ब्रिगे. सावंत म्हणाले की, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा अनेक वर्षापासून बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेच्याच उमेदवाराला मिळावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य सेनेच्या मंत्री, पदाधिकारी यांची मागणी होती. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासह कोकणातील अनेक मतदार संघ भाजपाच्या ताब्यात गेल्याने कोकणात यावेळी शिवसेनेचे चिन्ह दिसणार नाही याचे दुःख कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरली आहे.
गेल्या दोन वर्षांत आम्ही येथील विविध प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे तसेच वरिष्ठ मंत्र्यांचे लक्ष वेधूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आला आहे.युतीचा धर्म पाळून एकही प्रश्न सोडविला नाही. त्यांच्याकडून युतीचा धर्म पाळला गेल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आजही नागरिकांचे अनेक प्रश्न, समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. तसेच अद्याप कोणीही कार्यकर्त्यामधील नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करताना दिसत नाही . अथवा चर्चा केलेली नाही .त्यांना गृहीत धरून प्रचार सुरु झाला आहे.असेही यावेळी सुधीर सावंत यांनी सांगितले.
आमचे कार्यकर्ते अद्यापही सभ्रमात आहेत.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघ भाजपा कडे गेला. मात्र या मतदार संघातील युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबत शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत .त्यामुळे काय भूमिका घ्यावी हे अद्याप निश्चित झालेले नाही. असेही यावेळी माजी खासदार सुधीर सावंत यांनी सांगितले.
वरिष्ठांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवू
आपला बालेकिल्ला असलेला मतदार संघ भाजपकडे गेल्याने तसेच कोकणातील मतदार संघात शिवसेनेचे चिन्ह कुठेच् दिसत नसल्याने जिल्ह्यातील शिंदेसेनेचें कार्यकर्ते नाराज आहेत. शिवाय वरिष्ठ नेत्यांकडून अद्यापही काही सूचना नाहीत. त्यामुळे आपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून या निवडणुक प्रचारा बाबत पुढील भूमिका घेतली जाईल. असे सांगत ब्रिगे. सुधीर सावंत यांनीही आपली नाराजी उघड केली.