जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ मध्ये पदवीधर शिक्षिकापदी आहेत कार्यरत
कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’ राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२१-२२ जाहीर झाला होता. त्यांना हा पुरस्कार मुंबई, बांद्रा येथील रंग शारदा सभागृह येथे राज्याचे पर्यटन,कौशल्य विकास विभाग,महिला व बालविकास विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार कपिल पाटील तसेच अधिकारी व प्रा.जगदीश राणे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने संबोधिले जातात सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी कणकवली तालुक्यातील वाघेरी गावच्या मूळ रहिवासी व
जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. आपल्या शिक्षकी पेशात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम स्नेहलता राणे या राबवित असतात. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या माध्यमातून त्या सामाजिक उपक्रमातही नेहमीच अग्रेसर असतात.साहित्य क्षेत्रातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी विविध संस्थांमार्फत गौरविण्यात आले आहे. त्यांना राज्यशासनाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो – मुंबई ,बांद्रा येथिल रंग शारदा सभागृह येथे राज्याचे पर्यटन,कौशल्य विकास विभाग,महिला व बालविकास विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’ राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार स्नेहलता राणे याना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार कपिल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.