सावंतवाडी (प्रतिनिधी) : मल्टीस्पेशालिटीसाठी सावंतवाडी शहरात जागा उपलब्ध होत नसल्याने वेत्ये येथे ते हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी आमची मागणी होती. ती वेळेत पूर्ण झाली असती तर ऐव्हाना हॉस्पिटल उभे राहीले असते. मात्र उध्दव ठाकरेंकडे खोट्या तक्रारी करुन त्या शुभकार्यात अपशकुन करण्याचे पाप दीपक केसरकरांनी केले, असा आरोप इन्सुली येथे आयोजित सभेत खासदार विनायक राऊत यांनी केला. दरम्यान या ठिकाणी मी काही काम केले नाही असे सांगुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तुम्ही काहीही केलात तरी या ठिकाणची जनता माझ्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे, तसेच मी मोठ्या मताधिकक्याने पुन्हा तिसऱ्यांना निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून इन्सुली येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळा गावडे, जिल्हाप्रमुख संजय पडते, मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवका वनिता इन्सुलकर, राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख अर्चना घारे, जान्हवी सावंत, काँग्रेसचे विकास सावंत, अॅड. दिलीप नार्वेकर, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, विवेक गवस आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राऊत म्हणाले, कोकणात पिकणाऱ्या काजूला परदेशात भरपूर मागणी असूनही त्याचा दर दरवर्षी कमी होत आहे. आमदार दीपक केसरकर यांनी या काजूला १३५ रुपये भावदेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन हवेत विरले. मात्र स्वतःसाठी अभिनेत्यांची व्हॅनिटी व्हॅन वापरतात, ती दोन कोटी किमतीची गाडी फिरायला आणली. त्यातूनच त्यांचा ‘खोक्यां’चा प्रताप दिसतो. त्यावेळी त्यांना काजू शेतकरी किंवा सर्वसामान्य जनता दिसत नाही. आपण संसदेत काजू आयातीवर वीस टक्के आयात कर लावण्याची मागणी केली होती. मात्र भाजप सरकारने ती फक्त पाच टक्क्यांवर आणली आणि राज्य सरकारने अडीच टक्के केली. त्यामुळे दर्जाहीन काजू आयात करून आपल्या काजूची मागणी कमी करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे.
राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, तेव्हा आम्ही आमच्या जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केले. ताबडतोब ते मंजूर करून त्यासाठी निधी दिला. सावंतवाडीसाठीसुद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी निधी दिला. मात्र केसरकर यांच्या हट्टापायी ते रखडले आहे. आम्ही वेत्ये येथे त्यासाठी आग्रही होतो. मात्र त्यांनी त्यालासुद्धा विरोध केला. त्यामुळे येथील जनतेला गोवा येथे उपचारासाठी जावे लागते.
बाळा गावडे म्हणाले, भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी इडीला घाबरून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी अडीच वर्षे केंद्रात मंत्री राहूनही आपल्या जिल्ह्यातील जनतेचा विकास न करता फक्त आपला आणि आपल्या परिवाराचा विकास केला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सोनाली मेस्त्री, महिला उपतालुकाप्रमुख श्रावणी धुरी, संदीप कोठावळे, सुनील देसाई, आबा धुरी, तातो परब, मनोहर गावकर, संतोष मेस्त्री, कौस्तुभ गावडे, सुभाष गावकर, रियाज खान, न्हानू कानसे, रघुवीर देऊलकर, संजय पालव, विनोद गावकर, रमेश गावकर, चंद्रकांत कासार, प्रदीप कोठावळे, आपा कोठावळे, सूर्यकांत गावडे, लवू गावडे, संदीप बोर्डेकर, शिल्पा पालव, स्मिता वागळे, मंथन गवस, उल्हास गावडे, अनिल आईर, विष्णू परब, पिंटो गावडे, गजानन गावकर, बाळू मेस्त्री, स्वप्रील नाईक, आबा धुरी, राजेश सावंत आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पालव यांनी, तर आभार कौस्तुभ गावडे यांनी मानले. यावेळी संजय पडते, विकास सार्वत, प्रवीण भोसले, जानवी सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.












