२.५० किलो गांज्यासह दोघेजण पोलिसांच्या अटकेत
सावंतवाडी (प्रतिनिधी) : गांजा बाळगल्याप्रकरणी गोवा पेडणे येथील घटनेत सावंतवाडीच्या तर दुसऱ्या एका घटनेत झारखंड येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. गोव्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, या दोन ठिकाणी गुन्हे शाखेने कारवाई करत दोघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने पोरसकोडे, येथे अमली पदार्थ तस्करी प्रकरणी कारवाई केली. या कारवाईत सावंतवाडी येथील रहिवाशी तरूणाला देखील अटक केली आहे. नासिर हुसैन (वय 23) असे अटक तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून 2.50 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात दोन लाख 05 हजार रूपये किंमत आहे. अशी माहिती समोर आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. तसेच, गुन्हे शाखेने दुसऱ्या एका कारवाईत झारखंड येथील युवकाला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. सुरेश कुमार (वय 24, रा. धनबाद, झारखंड) असे अटक संशयित आरोपीचे नाव आहे. संशयिताकडे काळ्या रंगाची एक बॅग होती, त्यात अमली पदार्थ असण्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यात 1.100 किलोग्रॅम वजनाचा गांजा सापडला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुझुकीची दुचाकी देखील जप्त केली आहे. असा एकूण 1 लाख दहा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.