निलेश राणेंना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दुर ठेवण्यात आमदार नितेश राणे यशस्वी…!

राज ठाकरेंच्या सभेतील निलेश राणेंची अनुपस्थिती राजकीय निवृत्तीचे संकेत…

निलेश राणेंच्या शिवराळ भाषेमुळेच त्यांना राणे कुटुंबीयांनी प्रचारापासून दुर ठेवले…!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा खोचक टोला..

कणकवली (कणकवली) : माजी खासदार निलेश राणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त राहिले आहेत. कणकवली येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेतील निलेश राणेंची उपस्थिती सर्व काही आलबेल नसल्याचे दर्शवत होती. आमदार नितेश राणेंनी याच सभेत भाषण केले परंतु निलेश राणेंचे अस्तित्वच जाणवले नाही. खर तर निलेश राणे हे त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी ओळखले जातात. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात निलेश राणेंची आक्रमक भाषणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला ऐकायला मिळाली नाहीत. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दुर ठेवण्यामागे आमदार नितेश राणेँचाच हात नाही ना, असा खोचक प्रश्न युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उपस्थित केला आहे. 

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात अवधूत गुप्तेंच्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणेंनी नितेश राणे हेच आपले राजकीय वारसदार आहेत, असे जाहीरपणे सांगितले होते. त्याचीच प्रचीती या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. आमदार नितेश राणे राजकीय वारसाच्या लढाईत निलेश राणेंना मात देण्यात यशस्वी झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात गुहागर येथील सभेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधवांविरोधात निलेश राणेंनी जी शिवराळ भाषा वापरली त्यामुळे राणे कुटुंबीय आणि एकंदरीतच भाजप पक्ष काहीसा बॅकफुटवर गेला होता. निलेश राणेंनी अशाच प्रकारची शिवराळ भाषणे जाहीर सभांमधून केली तर नारायण राणेंना त्याचा फटका बसेल याची पूर्वकल्पना असल्यानेच खबरदारीचा उपाय म्हणून निलेश राणेंना प्रचारापासून दूर ठेवण्यात आले आहे.  

भाजपच्या पॉलिसीनुसार एका कुटुंबात एका निवडणुकीसाठी एकच उमेदवारी मिळते. राणे कुटुंबियांसाठी ही पॉलिसी भाजप बदलणार नाही. लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत नितेश राणे किंवा निलेश राणे या दोघापैकी कुणा एका भावालाच उमेदवारी मिळेल. नितेश राणे हे विद्यमान आमदार असल्यामुळे निलेश राणेंना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची सुतराम शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक लढवू नये अशी निलेश राणेंची इच्छा होती. मात्र नितेश राणेंनी हट्ट करून नारायण राणेंना लोकसभा निवडणूक लढवायला लावली आणि विधानसभा निवडणुकीतून मोठ्या भावाचा पत्ता कट केला. सप्टेंबर महिन्यात निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राणे कुटुंबीयांनीच डावलल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे निलेश राणेंनी राजकीय निवृत्ती जाहीर करावी, असा खोचक टोला सुशांत नाईक यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!