नवनियुक्त शिक्षकांना नियुक्ती आदेश ध्या! , प्राथमिक शिक्षक भारती संघटनेची मागणी

अन्यथा २० मे पासून बेमुदत धरणे आंदोलन

मसुरे (प्रतिनिधी) : नवनियुक्त शिक्षकांच्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना नियुक्तीचे आदेश देण्याबाबतची प्रक्रिया २० मे २०२४ पूर्वी पूर्ण न केल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने दिला आहे.

पवित्र प्रणाली शिक्षक भरती २०२२ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाच्या ६०४ व उर्दू माध्यमाच्या ११ उमेदवारांची सर्व कागदपत्राच्या मूळ व साक्षांकित प्रतीसह ४/०३/२०२४ ते दिनांक ६/०३/२०२४ या कालावधीत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागात पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ५८६ व उर्दू माध्यमाच्या ११ उमेदवार पात्र ठरले. त्या सर्व पात्र उमेदवारांना ८/०३/ २०२४ रोजी समुपदेशनाद्वारे काही उमेदवारांना नियुक्तीचे आदेशही देण्यात आले व त्यानंतर अचानक मध्येच समुपदेशन प्रक्रिया थांबवण्यात आली. शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत बदली करण्याचे ग्रामविकास विभागाचे आदेश असल्यामुळे सदरची भरती प्रक्रिया थांबवत असल्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या (त्या दिवशी शासनाचे कोणतेच आदेश लेखी आदेश नव्हते) व त्यानंतर भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली व तब्बल पाच दिवसांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रथम करून नंतर अभियोग्यताधारक नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन करावे असे शासन निर्देश मिळाल्यानंतर सदरचे आदेश रद्द केले. जिल्हा अंतर्गत बदली बाबत कोणतेही बदली निकष नसल्याने त्याबाबत संभ्रम व्यवस्था असल्यामुळे त्याही केलेल्या नाहीत.यापूर्वी

निवेदने देऊन माननीय शिक्षणाधिकारी जि. प.सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन चर्चा करताना जिल्हा अंतर्गत बदली व भरती करणे याबाबत प्रशासन अजूनही संभ्रमावस्थेत आहे.ज्या कारणासाठी नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन प्रक्रिया थांबून दिलेले आदेश रद्द केले, त्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिये बाबत प्रशासन अजूनही उदासीन आहे असे निदर्शनास आले. त्यामुळे गेले दोन महिने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानी बरोबर नवनियुक्त शिक्षकांचेही आर्थिक व मानसिक खच्चीकरण झाल्याचे संघटनेची धारणा झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सध्या देशात लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू असतानाही माननीय निवडणूक आयोगाने ज्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली आहे अशा ठिकाणी नवनियुक्त शिक्षक पदभरतीस परवानगी दिलेली आहे व तसे निर्देश माननीय शिक्षण संचालक पुणे व माननीय ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया ही दिनांक ७ मे २०२४ रोजी पूर्ण होत असल्याने दिनांक ८ मे पासून यापूर्वी ७ मार्च रोजी जाहीर करण्यात करण्यात आलेल्या नवनियुक्त शिक्षकांच्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना नियुक्तीचे आदेश देण्याबाबतची प्रक्रिया २० मे २०२४ पूर्वी पूर्ण करण्यात यावी. अन्यथा नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने सोमवार दिनांक २०/०५/२०२४ पासून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर सकाळी ११ ते सायं.५.०० या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!